पीएम मोदींचे वाराणसीत शक्तीप्रदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मोदी मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता वाराणसी विमानतळावर पोहोचतील. तेथून हेलिकॉप्टरने मिर्झामुदारच्या मेहदीगंज येथील किसान संवाद कार्यक्रमाच्या ठिकाणी जातील. यानंतर मेदी शेतकऱ्यांना संबोधित करतील आणि देशातील 9.60 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात DBT अंतर्गत 20 हजार कोटींहून अधिक रुपयांचा PM किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्त्याची रक्कम टाकतील.
याशिवाय 30 हजारांहून अधिक प्रशिक्षण घेतलेल्या कृषी सखींना प्रमाणपत्रे मोदींच्या हस्ते दिली जातील आणि डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (KKC) काशी येथून सुरू केले जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी पिकवलेली उत्पादने पाहण्यासाठी मोदी कृषी प्रदर्शनातील स्टॉलला भेट देतील आणि 21 प्रगतीशील शेतकऱ्यांना भेटतील.
वाराणसीत मोदींचा रोड शो
शेतकरी परिषदेनंतर पीएम मोदी कालभैरव आणि काशी विश्वनाथ मंदिराला भेट देतील. यानंतर गंगा घाटाकडे मोदी निघतील. पोलीस लाइन ते गंगा घाट असा साधारण आठ किलोमीटर लांब रोड शो मोदींच्या नेतृत्वात होण्याची शक्यता वर्तवली आहे. आठ किलोमीटर लांबीच्या मार्गावर प्रत्येक चौक, नाका आणि इमारती शुभेच्छाचे पोस्टर लावून सजावण्यात येतील . पंतप्रधानांवर 20 क्विंटल गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव रोड शो दरम्यान करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी जनता आणि भाजप कार्यकर्ते पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत करतील. पीएम मोदी कालभैरव मंदिरात पारंपारिक पूजा करतील. तर काशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा करती 108 कमळांनी मोदी अभिषेक करणार आहेत.
गंगा घाटेवर मोदी करणार महाआरती
पंतप्रधानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर काशी विश्वनाथ मंदिर आणि दशाश्वमेध घाटाला फुलांच्या माळांनी सजवण्याची तयारी सुरू आहे. सुमारे शंभर क्विंटल फुलांनी मंदिर आणि घाट सजवण्यात येणार आहेत. दशाश्वमेध घाटावरील आरती स्थळही खास पद्धतीने सजवण्यात येणार आहे. दशाश्वमेध घाटाबरोबरच आजूबाजूचे घाटही देव दिवाळी सणाप्रमाणे सजवले जाणार आहेत. गंगा सेवा निधीतर्फे आयोजित दैनंदिन आरती व्यतिरिक्त नऊ विशेष अर्चक गंगा मातेची आरती करतील. घाट आणि पायऱ्यांवर रेड कार्पेट अंथरले जाईल, ज्यामुळे संपूर्ण देखावा आणखीनच सुंदर होईल.
काशीमध्ये पंतप्रधान मोदी 16 तास घालवणार आहेत. किसान संमेलन आणि देव दर्शनानंतर ते बरेका येथील ऑफिसर्स गेस्ट हाऊसमध्ये रात्रीचा मुक्काम करतील. संध्याकाळी पंतप्रधान रोप-वे प्रकल्पाची ऑन-साईट पाहणी देखील करू शकतात. त्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान दिल्लीला रवाना होतील.