मुकेश कुमार मीना हे पिपावाव बंदर रेल्वे स्थानकावरून साईडिंगच्या (मुख्य कॉरिडॉरच्या बाजूला एक लहान ट्रॅक) दिशेने मालगाडी चालवत असताना ही घटना घडली आहे. सोमवारी पहाटे रेल्वे ट्रॅकवरुन ही ट्रेन चालवताना १० सिंहांना समोर पाहून लोको पायलटने तात्काळ ब्रेक दाबला आणि त्या सिंहांचा जीव वाचला.
‘मीना यांना १० सिंह रेल्वे ट्रॅकवर पहुडले असल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ गाडीचे ब्रेक दाबले. नंतर त्यांनी सिंह ट्रॅकवरुन बाजूला होईपर्यंत ट्रेन थांबवली आणि सिंह जाताच ट्रेन गंतव्य स्थानाच्या दिशेने मार्गस्थ केली. लोको पायलटच्या या उल्लेखनीय कामाचे विभागातील अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे, असे रेल्वे विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच ‘भावनगर रेल्वे विभागाकडून सिंहांसह अन्य वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. विभागाच्या निर्देशानुसार, या मार्गावरील लोको पायलट ट्रेन चालवताना दक्ष राहतात आणि विहित वेग मर्यादेनुसारच ट्रेन चालवतात,’ अशी माहिती देखील देण्यात आली.
पायलट मीना यांनी सूर्योदयापूर्वी टॉर्चच्या प्रकाशात शूट केलेल्या व्हिडिओमध्ये, सिंह बाजूच्या जंगलात जाण्यापूर्वी रुळांवरून चालताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, पिपावाव बंदर आणि उत्तर गुजरातला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांत अनेक सिंहांचा मृत्यू झाला आहे. जरी हे बंदर गिर वन्यजीव अभयारण्याच्या बाहेरील परिघापासून बऱ्याच अंतरावर असले तरी सिंह या भागात नियमितपणे फेरफटका मारत असतात, सिंहांना रेल्वे अपघातापासून वाचवण्यासाठी राज्याच्या वनविभागाने ठराविक अंतराने रुळावर कुंपण उभारले आहेत. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अलीकडच्या काळात, गुजरात उच्च न्यायालयाने, अनैसर्गिक कारणांमुळे आशियाई सिंहांच्या होणाऱ्या मृत्यूबद्दल सुओ मोटो जनहित याचिकेवर सुनावणी घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने रेल्वे अपघातापासून सिंहांचा बचाव करण्यासाठी शासनाने ठोस पावलं उचलावीत अशा सूचना देखील दिल्या. दरम्यान जून २०२० मध्ये झालेल्या शेवटच्या गणनेनुसार, गुजरातमध्ये ६४७ आशियाई सिंह आहेत.