Cab Driver: कारमध्ये एसी लावून झोपला, सकाळी काही प्रतिसाद देईना, काच फोडून बाहेर काढलं पण…

गाझियाबाद: कॅब चालकाला उकाड्यामुळे आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गरमीपासून वाचण्यासाठी हा कॅब चालक गाडीमध्ये एसी लावून झोपला, तो सकाळी मृतावस्थेत आढळून आला. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ही हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा चालक एसी सुरू ठेवून कारमध्ये झोपला होता. त्यानंतर रात्री गाडीतील पेट्रोल संपलं आणि कार बंद पडली. जेव्हा सकाळी कार मालक आला तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडीची काच फोडली, चालकाला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कल्लू दुबे (वय ३६) असं मृत चालकाचं नाव आहे. तो हमीरपूरचा रहिवासी होता आणि साहिबाबाद गावात कॅब चालवत होता. कारमध्ये एसी चालू करुन झोपला असताना गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल, असं इंदिरापुरम एसीपी स्वतंत्र सिंग यांनी सांगितले.

५ दिवसांपूर्वीच गावावरुन परतला होता

कल्लू हा टीला मोड परिसरात राहणाऱ्या अमलेशची कार चालवायचा. अमलेशने सांगितले की, कल्लू १ महिन्यासाठी त्याच्या गावी गेला होता. ५ दिवसांपूर्वी तो परत आला आणि पुन्हा कार चालवू लागला. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी बुकिंगसाठी कल्लूला फोन केला होता. जेव्हा त्यांनी अनेकवेळा कॉल करुनही कल्लूने फोन घेतला नाही, तेव्हा ते कल्लूच्या शोधात निघाले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांना प्रल्हादगडी येथील एका ठिकाणी कार पार्क केलेली आढळली. त्या कारमध्ये कल्लू होता. कल्लूला अनेकदा हाक मारुनही त्याने प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर त्यांनी पोलिसांना आणि कुटुंबातील सदस्यांना याबाबतची माहिती दिली.

पोलिसांनी येताच काच फोडली आणि कल्लूला बाहेर काढलं, तेव्हा कल्लू हा घामाने पूर्णपणे भिजलेला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमलेश आणि कल्लू एकमेकांना ७ वर्षांपासून ओळखत होते. कल्लूला एक ८ वर्षांचा मुलगा आहे, त्याच्या पत्नीचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे आता त्याचा मुलगा पोरका झाला आहे, असं कल्लूच्या भावाने सांगितलं.

प्राथमिक तपासानुसार, कल्लू गाडी सुरु करुन त्यातील एसी सुरु करुन झोपी गेला होता. पेट्रोल संपल्यानंतर गाडी सीएनजीवर स्विच झाली नाही बंद पडली. एसीमध्ये झोपलेला असल्याने त्याला कदाचित जाग आली नसेल. जेव्हा गाडी बंद पडली तेव्हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाला असावा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची तांत्रिक तपासणी केली जाईल, जेणेकरून त्यात काही बिघाड होता का हे कळू शकेल.

Source link

cabcar acghaziabad cab driver death by suffocationMan Dies In Car Due To ACnational newsup newsyouth died in car sleepingएसीमुळे कार चालकाचा मृत्यूगडीत चालकाचा मृत्यूगाझियाबादताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment