फादर्स डेला लेकीसाठी शिफ्ट बदलली अन् वडिलांचा मृत्यू; रेल्वे अपघाताची मन सुन्न करणारी कहाणी

कोलकाता: पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसचे गार्ड आशिष डे यांचाही समावेश होता. फादर्स डेच्या दिवशी आपल्या मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी आपलं ड्युटी रोस्टर बदलले होते. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर, त्यांच्या मुलीला या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

फादर्स डेच्या दिवशी आपल्या मुलीसोबत आणखी काही वेळ घालवण्यासाठी आशिष यांनी त्यांचे ड्युटी रोस्टर बदलले होते. त्यांची मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून कोलकाता येथे राहते. फादर्स डेच्या दिवशी ते सर्व त्यांच्या घरी जमले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते न्यू जलपाईगुडी स्टेशनवर ड्युटीवर जाण्यासाठी निघाले आणि मग त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

आशिष डे हे सिलीगुडी येथील सुकांत पल्ली येथील रहिवासी होते. ते शताब्दी एक्स्प्रेसमध्ये गार्ड होते. पण फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी आपली ड्युटी बदलली आणि सोमवारी सकाळी ते कांचनजंगा एक्स्प्रेसमध्ये गार्ड म्हणून चढले.

अवघ्या दीड तासात कंचनजंगा एक्स्प्रेसचा अपघात

आशिष डे हे गार्ड म्हणून सिलीगुडीहून कांचनजंगा एक्स्प्रेसमध्ये चढले होते. अवघ्या दीड तासात कांचनजंगा एक्स्प्रेसचा रंगपणीजवळ भीषण अपघात झाला आणि आशिष यांना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी (१७ जून) सियालदहजवळ एका मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली. या अपघातात गार्डच्या डब्यासह रेल्वेच्या दोन डब्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात लोको पायलट, को-लोको पायलट आणि कांचनजंगा एक्स्प्रेसचे गार्ड आशिष डे यांचा मृत्यू झाला.

आशिष यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंब हळहळलं

आशिष डे यांचा मृतदेह उत्तर बंगाल मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आला होता. तेथून त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आला. वडिलांचा मृतदेह पाहून त्यांची मुलगी धायमोकलून रडली, पत्नीलाही अश्रू अनावर झाले होते.

Source link

Bengal Railway AccidentDeath of Kanchenjunga Guard Ashish DeyKanchenjunga Express Train AccidentWest Bengal train accidentकंचनजंगा गार्ड आशीष डे मृत्यूपश्चिम बंगाल रेल्वे अपघातफादर्स डेबंगाल रेल्वे अपघात
Comments (0)
Add Comment