हे प्रकरण सिहोनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्वारी नदीवर वसलेल्या गोपी गावाशी संबंधित आहे. मृत महिलेची साडी आणि चप्पल पाहून तिच्या पतीने तिची ओळख पटवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला ६ फेब्रुवारी रोजी तिच्या दिरासोबत पळून गेली होती. त्याची तक्रार अंबा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. आता ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.
धरणाचे दरवाजे उघडले, पाणी कमी होताच कार दिसली
गोपी गावाजवळ क्वारी नदीवर एक स्टॉप डॅम बांधण्यात आला आहे. धरणात पाणी जास्त असल्याने मंगळवारी दुपारी त्याचे दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे उघडल्यानंतर धरणातील पाणी कमी होताच गावकऱ्यांना त्यात एक कार दिसली आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सिहोनिया पोलीस ठाण्याचे प्रभारी घरमेंद्र गौर आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या सहाय्याने कार पाण्याबाहेर काढली. ती बाहेर काढल्यानंतर ती कार होंडा सिटी कंपनीची असल्याचे आढळून आले. त्याचा क्रमांक MH 03-BC- 8720 होता, त्यावरुन ही कार महाराष्ट्रातील असल्याचं स्पष्ट झालं. या कारची दारं आतून बंद होती.
जेव्हा पोलिसांनी कारची दारं उघडली तेव्हा आतून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. कारच्या आत पुढच्या आणि मागच्या सीटवर एक महिला आणि एका पुरुषाचे सांगाडे दिसून आले. हे दोन्ही सांगाडे कारमधून बाहेर काढण्यात आले आणि मग पोलिसांनी कारच्या नंबरवरुन तपास सुरू केला. मृत महिला अंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. ती बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी महिलेच्या पतीला घटनास्थळी बोलावले असता, तिची साडी आणि चप्पल पाहून त्याने तिची ओळख पटवली.
ओळख पटताच पोलिसांनी दोन्ही सांगाडे शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ते पोस्टमॉर्टमसाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले. पोलीस चौकशीत महिलेच्या पतीने सांगितले की, तो सरकारी शिक्षक आहे. त्याची पत्नी ही ६ फेब्रुवारीला त्याच्या चुलत भावासह पळून गेली होती. महिलेसोबत सापडलेल्या पुरुष सांगाड्याची अद्याप ओळख पटलेली नाही, तरी तो तिच्या दिराचा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र महिलेच्या घरातील सदस्य तिचा सांगाडा ओळखण्यास टाळाटाळ करत आहेत. घरातून पळून गेल्यानंतर मयत महिलेने प्रियकरासह आत्महत्या केली की दोघांची हत्या करून धरणात फेकून दिले, याबाबत अद्याप पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही. पोलीस खून आणि आत्महत्या या दोन्ही अँगलने तपास करत आहेत.