‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’

सांगली: लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’वरून (Maharashtra Bandh) भाजपच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘हा महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ कांगावा आहे. स्वत:च्या घराला आग लागलेली असताना, शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखं आहे,’ अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांतील दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. भाजपनं मात्र हा बंद फसल्याचा दावा केला आहे. तसंच, महाविकास आघाडीवर जोरदार टीकाही केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे. ‘लखीमपूर घटनेबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती व सहवेदना आहे. त्यामुळंच या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. उत्तर प्रदेशचे आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सक्षम नेते आहेत. शेतकऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणात ते निश्चितच कठोर कारवाई करतील. आघाडीच्या नेत्यांनी त्याची चिंता करू नये. जनाब संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल बोलावं,’ असा टोला पडळकर यांनी हाणला आहे.

वाचा: मोदी सरकारनं राजकारणातली माणुसकीच संपवून टाकलीय – सुप्रिया सुळे

‘ओल्या दुष्काळामुळं राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, असं म्हणणारे अद्याप मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबुगिरीत अडकवून ठेवलंय. त्यामुळं त्यांचा आजचा बंद म्हणजे निव्वळ कांगावा आहे. स्वत:च्या घराला आग लागलेली असताना, शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखं आहे,’ असं पडळकर म्हणाले. ‘संजय राऊतांना खरं दु:ख काकांना होणाऱ्या त्रासाचं आहे. मोदींनी महाराष्ट्रातील सहकारातील प्रस्थापितांची कीड साफ करायचं ठरवलंय. ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, कारखाने कवडीमोल दरानं गिळले या सगळ्यांभोवती फास आवळला जात आहे. त्यामुळंच ह्याचं पित्त खवळलंय आणि महाराष्ट्र बंदचा देखावा केला गेलाय,’ असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

Source link

Gopichand PadalkarGopichand Padalkar attacks Maha Vikas Aghadimaharashtra bandhSanjay Rautगोपीचंद पडळकरमहाराष्ट्र बंदसंजय राऊत
Comments (0)
Add Comment