विमानतळावर संशयास्पद हालचाली, आणि …
१८ जून रोजी संध्याकाळी जवळपास ५ वाजून २० मिनिटांनी प्रोफायलिंग आणि बिहेवियर डिटेक्शनच्या आधारे अर्थात व्यक्तीच्या संशयास्पद हालचालींमुळे सीआयएसएफच्या जवानाने टर्मिनल-३ च्या चेक-इन भागात एका प्रवाशाला चौकशीसाठी रोखलं. चौकशीत त्या व्यक्तीने आपली ओळख रशविंदर सिंह सहोता, वय ६७ असल्याचं सांगितलं. पासपोर्टवर त्याची जन्मतारीख १०-०२-१९५७ आणि पीपी नंबर ४३८८५१, ओळख भारतीय म्हणून दाखवली होती. त्याच्या पासपोर्टचा तपास, तसंच चौकशीदरम्यान, त्याचं वय पासपोर्टमध्ये दिलेल्या वयाहून कमी वाटत होतं. त्याचा आवाज आणि त्वचादेखील एखाद्या तरुण व्यक्तीप्रमाणे असल्याचं चौकशीत लक्षात आलं.
त्याने पासपोर्टमध्ये दिलेले डिटेल्स आणि त्या व्यक्तीकडे प्रत्यक्ष पाहता कोणत्याही बाजू जुळून येत नव्हत्या. त्याने दिलेल्या पासपोर्टवरील माहिती आणि त्याला समोर प्रत्यक्ष पाहाताना अनेक गोष्टीत तफावत आढळली. अतिशय बारकाईने पाहिलं असता, त्याने त्याचे केस आणि दाढी पांढऱ्या रंगाने रंगवलेले आणि वृद्ध दिसण्यासाठी चष्मा घातला होता.
२४ वर्षीय तरुण ६७ वर्षांचा वृद्ध बनून करत होता प्रवास
त्याचा पासपोर्ट आणि त्याला प्रत्यक्ष पाहता संशय आला. त्यानंतर या संशयाच्या आधारे त्याची कसून चौकशी करण्यासाठी, शोध घेण्यासाठी डिपार्चर भागात त्याला नेण्यात आलं. त्याच्या मोबाईल फोन तपासला असता, त्याच्या फोनमध्ये आणखी एका पासपोर्टची सॉफ्ट कॉपी मिळाली. त्या पासपोर्टनुसार, त्याचा नाव भारतीय गुरु सेवक सिंह, वय २४, जन्म तारीख १०-०६-२००० लिहिल्याचं आढळून आलं.
चौकशीत तरुणाने दिली माहिती
चौकशीत तरुणाने सांगितलं, की त्याचं खरं नाव गुरु सेवक सिंह असून तो २४ वर्षांचा आहे. पण तो ६७ वर्षीय रशविंदर सिंह सहोता या नावाच्या पासपोर्टने प्रवास करत होता. हे प्रकरण बनावट पासपोर्ट आणि फसवेगिरीचं असल्याने त्या तरुणाला त्याच्या सामानासह कायदेशीर कारवाईसाठी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.