देवदूत ठरलेल्या हरियाणातील चंडीमंदिर येथील वेस्टर्न कमांड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी मेजर सिमरत राजदीप सिंग यांनी या घटनेबद्दल सांगितले की, विमानातून प्रवास असताना मूळचा बेळगावचा असणारा तरुण आपल्या भावासोबत गोवा एअरपोर्टवरुन विमानात चढला. ३९ हजार फूट उंचीवरील प्रवासादरम्यान या तरुणाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला.
सिंग यांच्या लक्षात आले की तरुणाला ‘फ्युअड ओव्हरलोड’ झालाय आणि गुंगी येत आहे. तसेच त्याला उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आणि श्वसनविकार असल्याची लक्षणं दिसत होती आणि त्यातच त्या तरुणाच्या श्वासांची गती वाढली. याबद्दल सिंग यांनी त्या तरुणाच्या भावाला त्याच्या याआधीच्या वैद्यकीय प्रकृतीविषयी विचारणा केली असता त्यांना कळले की, तरुण मुत्रपिंडाच्या रोगापासून ग्रस्त होता.
सुदैवाने, सिंग यांच्या आपत्कालीन वैद्यकीय कीटमध्ये बहुतेक आवश्यक उपकरणे आणि औषधे होती. ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ते या तरुणाला उपचार देऊ शकले. सिंग यांनी त्याला लसीमार्फत औषध दिले आणि सलग एक सतत ऑक्सिजनवर ठेवले.
परिस्थितीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंग यांनी वैमानिकाला विमान कमी उंचीवर नेण्याचे सांगत इमर्जन्सी लँडिंग करण्याची विनंती केली. चंदीगड अजून दोन तासांवर अंतरावर असल्याने लँडिगसाठी जवळचा पर्याय म्हणून मुंबई विमानतळावर विमान उतरवण्यात आले. त्यानंतर तरुणाला तात्काळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर एन कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सिंग यांनी नंतर त्या व्यक्तीवर उपचार करणाऱ्या मुंबईतील डॉक्टरांशी चर्चा केली. रुग्णाला तात्काळ रक्तशुद्धीकरणाचे उपचार देण्यात आले आणि त्याची प्रकृती आता स्थिर आहे, असे देखील सिंग यांनी नमूद केले आहे.
मेजर सिंग यांनी वेळेवर केलेला हा उपचार प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिक आणि विमान उड्डाणादरम्यान आवश्यक उपकरणे गाठीशी असण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे. ज्या वस्तू आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला जीवदान ठरु शकतात.