दिल्लीत उष्णतेमुळे इतके मृत्यू झाले आहेत की स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिल्लीच्या महापालिकेच्या बोध घाटावर करोनानंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात इतके अंत्यसंस्कार झाले आहेत. बुधवारी (१९ जून) रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल १४२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यापूर्वी, कोरोनाच्या काळात २२ एप्रिल २०२१ ला या घाटावर एका दिवसात २५३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
उष्णतेमुळे इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू
बोध घाटाच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे कारण उष्णता असू शकते. मात्र, बोध घाटावर अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांच्या मृत्यूचे कारण नोंदवले जात नाही, त्यामुळे सगळ्यांचाच मृत्यू उष्णतेमुळे झाला असं म्हणता येणार नाही. यावर्षी जून महिन्यात दिल्लीतील महापालिकेच्या बोध घाटावर आतापर्यंत ११०१ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. घाटावर मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे.
गेल्या आठवड्याभरात या घाटावर किती अत्यंसंस्कार झाले?
तारीख | किती मृतदेहांवर अंत्यसंस्कार |
१४ जून | ४३ |
१५ जून | ५३ |
१६ जून | ७० |
१७ जून | ५४ |
१८ जून | ९७ |
१९ जून | १४२ |
२०२२ सालचा रेकॉर्ड मोडणार?
जून २०२२ मध्ये या घाटावर १५७० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, जर याच प्रमाणात मृत्यू होत राहिले तर हा विक्रम मोडला जाऊ शकतो. नोंदीनुसार, जून २०२१ मध्ये १२१०, जून २०२२ मध्ये १५७० आणि जून २०२३ मध्ये १३१९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.