काहीच दिवसांपूर्वी मुंबईत अमूलच्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळून आलं होतं. तर आईस्क्रीममध्येच गोम आढळून आली होती. त्यानंतर आता वेफर्सच्या पॅकेटमध्ये मृत बेडूक सापडलं आहे. तर हर्षी चॉकलेट सिरपमध्ये मृत उंदिर आढळून आलं आहे. त्यामुळे पॅकेज्ड फूड तयार करणाऱ्या कंपन्या किती निष्काळजीपणे काम करतात आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी डीबी परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जास्मिन पटेल नावाच्या तरुणीने आम्हाला माहिती दिली की बालाजी वेफर्सने तयार केलेल्या क्रंचेक्सच्या पॅकेटमध्ये एक मृत बेडूक सापडलं आहे. जेथून ते खरेदी केलं होतं त्या दुकानात आम्ही गेलो. प्राथमिक तपासणीत ते मेलेलं बेडूक असल्याचं दिसून आलं, जे कुजलेल्या अवस्थेत होते. महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार आम्ही बटाट्याच्या चिप्सच्या या बॅचचे नमुने गोळा करू’.
नेमकं काय घडलं?
जामनगर येथील रहिवासी जास्मिन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चार वर्षांच्या भाचीने मंगळवारी संध्याकाळी घराजवळच्या दुकानातून हे पॅकेट विकत घेतले होते. त्यांच्या भाचीने मृत बेडूक पाहण्यापूर्वी त्यांनी आणि त्यांच्या ९ महिन्यांच्या मुलीने बटाट्याचे काही चिप्स खाल्ले होते.
‘बेडूक दिसताच माझ्या भाचीने पॅकेट फेकून दिले… तिने मला सांगितले तेव्हा माझा त्यावर विश्वास बसला नाही. पण मेलेला बेडूक पाहून मलाही आश्चर्य वाटले. बालाजी वेफर्सचे वितरक आणि कस्टमर केअरने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने मी सकाळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवले’, असंही जास्मिन यांनी सांगितलं.
चॉकलेट सिरपमध्ये मेलेलं उंदीर
एका कुटुंबाने झेप्टोवरून हर्षी कंपनीचे चॉकलेट सिरप मागवले होते. त्यांच्याकडे सीलबंद बाटली आली. पण, त्याच्या आत एक मेलेलं उंदीर सापडला. इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. व्हिडिओ शेअर करणाऱ्या प्रमी श्रीधर यांनी सांगितले की, कुटुंबातील तीन सदस्यांनी या चॉकलेट सिरपचे सेवन केले होते, त्यामुळे त्यांना तातडीने डॉक्टरांकडे न्यावे लागले.
या कुटुंबाने ब्राउनी केकसोबत खाण्यासाठी हर्षीचे चॉकलेट सिरप ऑनलाइन ऑर्डर केले होते. झेप्टोकडून खरेदी केलेले हे चॉकलेट सिरप सीलबंद होते. केकवर हे सिरप टाकण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संशय आला. हे सिरप खूप घट्ट होते आणि त्यातून केसांचा गुच्छा देखील बाहेर आला. ते पाहताच सारे हादरले आणि त्यांनी संपूर्ण सिरप हे एका कपमध्ये काढून पाहिलं, यावेळी त्यातून मृत उंदीर बाहेर आलं. जेव्हा हर्षी कंपनीला याबाबत कळालं तेव्हा त्यांनी कुटुंबाशी संपर्क करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी सांगितलं.