या बहुआयामी USBRL प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या रेल्वेमार्गाची लांबी ११९ किलोमीटर असून यामध्ये ३८ बोगदे आहेत. यामधील T-18 हा बोगदा सर्वात लांब असून त्याची लांबी जवळजवळ १२.७५ किमी इतकी आहे.हा बोगदा देशातील सर्वात लांब वक्र कमानीचा बोगदा आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १३ किमी लांबीचे ९२७ पूल आहेत.
चिनाब नदीवरील उंच पूलावरुन धावली भारतीय रेल्वे
यामध्ये चिनाब नदीवरील पूल हा सर्वाधिक आव्हानात्मक पूल समाविष्ट आहे. या पुलाची लांबी १३१५ मीटर इतकी आहे. या पुलाच्या लांबी १३१५ मीटर तर कमानीची लांबी ४९७ मीटर इतकी आहे. या गगनचुंबी पूलाची उंची ३९५ मीटर इतकी आहे. त्यामूळे याला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मानले जाते. रेल्वे बोर्ड,उत्तर रेल्वे,कोकण रेल्वे यांच्या संयुक्त कामगिरीतून निर्मित या पूलावरून गुरुवारी संगलदान ते रियासी दरम्यानच्या विद्युतीकरण केलेल्या ४६ किलोमीटर अंतराच्या मार्गावर रेल्वेचे परीक्षण पार पडले. यामध्ये या सर्वोच्च पूलावरुन ४० किमी प्रति तास या वेगाने ही रेल्वे धावली. याने भारतीय रेल्वेने एक महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
४० किलोमीटर बोगद्यांतून धावली रेल्वे
या परिक्षणादरम्यान रेल्वेने आपल्या मार्गात येणाऱ्या ९ बोगद्यांना पार केले. गुरुवारी १२ वाजून ३५ मिनिटांनी हे परीक्षण संगलदान येथून सुरू होवून रियासी पर्यंत संपले. यामधील येणाऱ्या ९ बोगद्यांतून ही रेल्वे यशस्वीपणे बाहेर पडली.या संपूर्ण बोगद्यांची संयुक्त लांबी ४० किलोमीटर इतकी होती. या परीक्षणादरण्यान पहिल्यांदाच संपूर्ण रेल्वे दुग्गा आणि बक्कल या स्थानकांदरम्यान असलेल्या चिनाब पूलावरुन धावली. जो जगातील सर्वात मोठा आर्च ( वक्र कमानीचा) पूल आहे. रेल्वेने पार केलेल्या अंतरामध्ये मध्ये T-44 हा सर्वाधिक लांबीचा बोगदाही समाविष्ट होता.
देशासाठी नवी ओळख ठरलेल्या या महत्वपूर्ण मार्गातील USBRL या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन २००९ साली करण्यात आले होते. या मार्गातील ४१ किलोमीटर लांबीच्या बनिहाल-संगलदान मार्गासहीत USBRLअंतिम टप्प्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २० फेब्रुवारी २०२४ रोजी केले होते. या मार्गावरील बनीहाल -खारी ते संगलदान भागापर्यंतच्या मार्गावरील विद्युत रेल्वेचे परीक्षण २०२४ च्या फेब्रुवारीमध्ये करण्यात आले होते.