नेमकं काय घडलं ?
फहीम अहमद असं चोरी करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो त्याच्या बहिणीला यूपीएससीची पूर्व परीक्षा देण्यासाठी घेऊन गेला होता. तत्यानं बहिणीला तिच्या परीक्षा केंद्रावर सोडले. आणि एका ज्वेलरीच्या दुकानात गेला. तेथून खरेदीच्या बहाण्याने त्याने दोन सोन्याच्या चेन आणि दोन सोन्याच्या बांगड्या चोरल्या आणि पळ काढला. दुकान मालकानेही त्याचा पाठलाग केला मात्र तो पळून गेला.
संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाला कैद
चोरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ हा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्याने दुकानदाराचे लक्ष विचलित केले अन् एक गळ्यातील चेन व हातातले ब्रेसलेट चोरून नेले. नंतर त्याने भिंतीवरून उडी मारली आणि तेथून पळ काढला. थोडा वेळ पुढे जाऊन लपला. नंतर कॅब बुक केली. स्वत:च्या गाडीकडे गेला. बहिणीला परीक्षा केंद्रावरून घेतले आणि घरी गेला.
पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल
डीसीपी अभिजीत आर शंकर यांनी या बाबतची अधिक माहिती दिली आहे ते म्हणाले की, ” आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आयपीसीच्या कलम 420 आणि 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे वडील बेकरीचे दुकान चालवतात. आरोपी सुद्धा त्यांना मदत करतो. त्याची घरची परिस्थिती चांगली असून सुद्धा त्याने चोरी केली. आरोपीवर या आधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.”
दरम्यान , या संपूर्ण प्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.