हायलाइट्स:
- समीर वानखेडे-मोहित कंबोज यांची भेट झाल्याचा दावा.
- मंत्री नवाब मलिक दोन दिवसांत रीलीज करणार व्हिडिओ.
- मोहित कंबोज यांनी मात्र मलिक यांचा दावा फेटाळला.
मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मलिक यांनी ही संपूर्ण कारवाईच बोगस असल्याचा दावा करत एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य केले आहे. त्यात आता मलिक यांनी आणखी नवा आरोप केला आहे. ( Mumbai Cruise Drug Case Updates )
वाचा:आर्यनला पकडून नेणारा किरण गोसावी गोत्यात; फसवणुकीचं नवं प्रकरण उघड
‘क्रूझवरील कारवाईत एनसीबीने ११ जणांना ताब्यात घेऊन त्यातील तीन जणांना नंतर सोडून दिले होते. त्यात ऋषभ सचदेव याचा समावेश होता. ऋषभ हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज (आडनाव बदलून भारतीय केले आहे) यांचा मेव्हणा आहे आणि त्याला सोडण्यासाठी भाजप नेत्यांनी दबाव टाकला’, असा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांचे हे आरोप लगेचच फेटाळत कंबोज यांनी मलिक यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. तशी नोटीसही त्यांनी मलिक यांना पाठवली आहे. या साऱ्या घडामोडी सुरू असतानाच मलिक यांनी सोमवारी नवा आरोप केला आहे.
वाचा:‘हजार कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्यानेच…’; बंदवरून विखेंचा आरोप
‘क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोहित कंबोज यांनी नेमके काय काय केले ते मी समोर आणणार आहे. कंबोज आणि समीर वानखेडे यांची ७ ऑक्टोबर रोजी कुठे भेट झाली, हे मला माहीत आहे. त्याचा व्हिडिओ मी एकदोन दिवसांत रीलीज करणार आहे. केवळ हीच कारवाई नाही तर रिया चक्रवर्ती हिला झालेली अटक आणि त्यानंतर सातत्याने अनेक सेलिब्रिटींना ज्या प्रकारे ड्रग्ज प्रकरणांत अडकवण्यात आले, त्या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश मी करणार आहे. बॉलीवूडला, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी एक मोठं षडयंत्र रचलं गेलं आहे. या सर्वामागे भाजप आहे आणि एका अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्या माध्यमातून सर्व कारवाया केल्या जात आहेत, हा माझा दावा आहे. येत्या काळात मी याचे अनेक व्हिडिओ माध्यमांच्या समोर आणणार आहे’, असे मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. मोहित कंबोज यांच्या नोटीसला उत्तर देणार असल्याचेही ते म्हणाले.
कंबोज यांनी मलिक यांचा दावा फेटाळला
समीर वानखेडे हे कसे दिसतात हे सुद्धा मी आजवर पाहिलेले नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्न दूरच राहतो, असे सांगत मलिक यांचा दावा मोहित कंबोज यांनी फेटाळला आहे. मी वानखेडे यांना भेटल्याचा पुरावा मलिक यांनी द्यावा नाहीतर दुसऱ्या नोटिशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही कंबोज यांनी दिला. जावई ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचे उघड झाल्यानेच मलिक यांचा हा सारा थयथयाट सुरू आहे, असेही कंबोज म्हणाले. माझा मेव्हणा ऋषभ सचदेव याला सोडण्यात आलं असेल तर त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. ज्यांच्याबाबत कोणतेही पुरावे नव्हते त्या सर्वांनाच एनसीबीने सोडले आहे. ड्रग्जशी काहीही संबंध नसल्यानेच यांना सोडले गेले आहे. त्यामुळे मलिक हे खोटे आरोप करून सर्वांची दिशाभूल करत आहेत. यासर्वात मलिक हे ड्रग्ज घेऊन बोलतात की काय असा मला प्रश्न पडलाय, असेही कंबोज म्हणाले.
वाचा:अनिल देशमुखांच्या घराची ९ तास झडती; अटक वॉरंटची चर्चा होती, पण…