दारूकांडातील मृतांमध्ये दोन महिला आणि एका तृतीयपंथीयांचा समावेश असल्याचे तमिळनाडूचे राज्यमंत्री ईव्ही वेलू यांनी सांगितले. या विषारी दारूकांडानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांसह पुरेशा संख्येने डॉक्टरांची सज्जता ठेवण्यात आली आहे. याशिवाय जीवरक्षक यंत्रणा असलेल्या अनेक अॅम्ब्युलन्सही तिथे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दारूकांडात जीव गमावलेल्या ३४ जणांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. गोकुळदास यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोग स्थापन करण्याचे आदेश तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिले आहेत. राज्याचे गृहसचिव आणि पोलिस महासंचालक या प्रकरणाची चौकशी करतील आणि अहवाल सादर करतील. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणती पावले उचलावीत, याबाबत आयोग सरकारला शिफारशी सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिली.
राज्यव्यापी आंदोलन
अवैध दारूचे उत्पादन आणि विक्री रोखण्यात द्रमुक सरकारच्या अकार्यक्षमतेविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी २२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. या दारूकांडानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उडवण्यात आली आहे.