प्रदर्शित झाल्यानंतर १४ व्या दिवसाची ‘मुंज्या’ची कमाई
दिग्गज कलाकार नसतानाही, कमी बजेट असणाऱ्या ‘मुंज्या’च्या भुताने बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असून चित्रपटाच्या कलेक्शनमध्येही वाढ होतेय. ‘मुंज्या’ प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरीही या चित्रपटाने बजेटपेक्षा दुपटीने व्यवसाय केला आहे.
‘मुंज्या’च्या कमाईबद्दल सांगायचं तर या चित्रपटाने सुरुवातीला ४ कोटींचं खातं उघडलं. त्यानंतर पहिल्या आठवड्यात ३५ कोटी ३ लाख रुपयांचं कलेक्शन केलं. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी ३ कोटी ५ लाख, शनिवारी ६ कोटी ५ लाख, रविवारी ८ कोटी ५ लाख, पुढच्या सोमवारी ५ कोटी २५ लाख तर मंगळवारी ३ कोटी ४ लाख आणि बुधवारी ३ कोटींची कमाई केली.
Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ च्या रिलीजच्या १४व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी २ कोटी १७ लाख रुपये कमावले. त्याचबरोबर या १४ दिवसांत एकूण ६७ कोटी ६२ लाख रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला. हा चित्रपट १०० कोट्यवधींचा आकडा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
‘मुंज्या’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं असून मॅडॉक फिल्म्सच्या सुपरनॅच्युरल युनिव्हर्सचा स्त्री, रूही आणि भेडिया या चित्रपटानंतर हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘मुंज्या’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोच आहे पण आता आदित्य सरपोतदार ‘कुकडा’ हा हॉरर-कॉमेडी ओटीटी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.