दिल्लीत अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उत्तरेतील वाढत्या उष्माघाताने लोक हैराण झालेले असताना पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासत आहे. याबद्दल आम आदमी पक्षाने शेजारच्या हरियाणा राज्यावर दिल्लीच्या हिस्स्याचे पाणी रोखून ठेवल्याचा आरोप केला आहे. पाण्याची समस्या अतिगंभीर पातळीला पोहोचल्यानंतर दिल्लीच्या जलमंत्री आप नेत्या आतिशी यांनी १९ जून रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. तसेच यासंबंधी पत्रकारपरीषद आयोजित करुन दिल्लीतील पाणीप्रश्न न सुटल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी शुक्रवारपासून आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल तसेच आप नेते संजय सिंग उपोषणस्थळी दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री केजरीवालांचा तुरुंगातून संदेश
यावेळी मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांनी तुरुंगातून दिलेला संदेश वाचून दाखवला . यामध्ये त्यांनी आतिशी यांच्या या उपोषणाला तुरुंगातून सदिच्छा देत या प्रश्नावरुन शेजारी राज्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘ तहानलेल्यांना पाणी देणे ही आपली संस्कृती आहे. दिल्लीला शेजारी राज्यांतून पाणी मिळते. या तीव्र उष्णतेत आम्ही शेजारी राज्यांकडून सहकार्याची अपेक्षा केली. परंतु हरियाणा ने दिल्लीच्या वाट्याच्या पाण्यात कपात केली. जरी दोन्ही राज्यांत दोन वेगवेगळ्या पक्षांचे सरकार असले तरी पाण्यावरुन राजकारण करण्याची ही वेळ आहे का ?’.
केजरीवाल उल्लेख करत असलेले राज्य हरियाणा असून तिथे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार आहे. हरीयाणातील भाजप सरकारच्या आडून आप सरकारला कोंडीत पडण्यासाठी भाजप याला खतपाणी घालत असल्याचा आरोप आप ने केला आहे.
दिल्लीतील अनेक भागात गेल्या काही आठवड्यापासून पाण्याची कमतरता जाणवत आहे. उत्तर पश्चिम भारतात वाढत्या उष्णतेने ही समस्या आणखी बिकट बनल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दिल्लीतील राजघाट येथील महात्मा गांधींच्या स्मारकाला अभिवादन करुन आतिशी यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी हरियाणा सरकारवर दिल्लीच्या वाट्याचे पाणी न दिल्याचा आरोप केला.