राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC)द्वारे राष्ट्रीय स्तरावरील उष्णतेसंबंधी आजार आणि मृत्यू देखरेख अंतर्गत संकलित केलेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्रालयाने उष्माघातात जीव गमावावा लागलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार १ मार्च ते २० जून दरम्यान, १४३ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४१,७८९ लोक उष्णतेच्या विळख्यात सापडले.
अनेक वैद्यकीय केंद्रांकडून अद्याप तपशीलवार माहिती साईटवर अपलोड झालेली नाही. तरीही आरोग्य मंत्रालयाने अधिकृत आकडेवारीत १४ लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. मार्च ते जून या कालावधीत उष्माघातामुळे मृत पावलेल्यांची संख्या चक्क १४३ वर पोहोचली आहे, जे गंभीर आहे.
उत्तर प्रदेशात उष्माघातांचा सर्वाधिक आकडा नोंदवला आहे, राज्यात उष्णतेने ३५ लोकांचा बळी घेतला. यानंतर दिल्लीचा नंबर लागतो, जेथे २१ लोकांचा मृत्यू झाला. तर बिहार आणि राजस्थानात प्रत्येकी १७ जणांना जीव गमवावा लागला आहे.
यासोबतच उत्तर आणि पूर्व भारतातील मोठा भाग बऱ्याच काळापासून उष्णतेच्या लाटेने प्रभावित आहे. परिणामी उष्माघाताच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या धर्तीवर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या सर्व रुग्णालयांमध्ये विशेष उष्माघात युनिट सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
उष्माघाताचा सामना करण्यासाठी रुग्णालयांची सज्जता कशी आहे, या स्थितीचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यादरम्यान केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाधित रुग्णांसाठी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था केली आहे की नाही हे तपासण्यास सांगितले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या आरोग्य विभागांना उष्णतेच्या लाटेचा सूचना जारी केल्या आहेत.
अति उष्णतेचे आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी आरोग्य विभागांनी तयारी करावी. तसेच मार्च ते जून महिन्यापर्यंतची उष्माघाताची प्रकरणे आणि मृत्यू याबद्दलची नियमित आकडेवारी संबंधित यंत्रणेला कळवली जावी, राष्ट्रीय हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम याअंतर्गत ही माहिती अपडेट केली जावी, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
उष्माघात प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी आरोग्य केंद्रामध्ये पुरेशी औषधे उपलब्ध असणे. तसेच औषधांच्या खरेदी आणि पुरवठ्यासाठी आघाडीवर राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.