असा आहे कार्यक्रम
मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी एक जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या दिवशी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले नागरिक मतदारयादीत नाव नोंदवण्यास पात्र असतील. मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम २५ जून ते २४ जुलै या कालावधीत होणार आहे. या काळात बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. त्यानंतर २५ जुलैला प्रारूप मतदारयाद्या जाहीर केल्या जातील. त्यावर नऊ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवता येतील. त्यानंतर २० ऑगस्टला मतदारयाद्या जाहीर केल्या जाणार आहेत.
चार राज्यांत तयारी
महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपत आहे, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी २५ जानेवारीला संपत आहे. तत्पूर्वी या राज्यांत विधानसभा निवडणुका घेणे गरजेचे आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघ फेररचनेनंतर नव्या विधानसभेची स्थापना करण्यासाठी निवडणुका घेणे गरजेचे असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
न्यायालयाचा आदेश
जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका घेतल्या जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले होते. सध्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचे नियोजित सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता.
मतदारसंघ फेररचना
केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरबाबतचे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केले होते. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्यानंतर आगामी काळात प्रथमच राज्यात विधानसभा निवडणूक होईल. मतदारसंघ फेररचनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये ८३ ते ९० विधानसभा मतदारसंघ असण्याची शक्यता आहे.
– हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर रोजी संपत आहे.
– महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे.
– झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पाच जानेवारी २०२५ रोजी संपत आहे.
– जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे.