खासदार बिष्णु रे यांचा गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते एका सभेत बोलत असल्याचे पाहायला मिळते. यादरम्यान ते म्हणाले की, मी लोकांची कामं करणारच आहे. पण ज्या लोकांनी भाजपला मत दिले नाही त्यांनी पूनश्च विचार केला पाहिजे.
बिष्णु रे पुढे म्हणाले की, निकोबार बेटावरील लोकांनी मला मत दिले नाही ना, तुमचे काय होईल याचा आता तुम्ही विचार कराच. तुमचे वाईट दिवस आहेत, असे म्हणत मतदारांना चक्क इशाराच दिला आहे.
‘निकोबारच्या नावावर पैसे घ्याल, दारू पिणार, पण मतदान करणार नाही. पण लक्षात ठेवा असे करुन तुम्ही अंदमान आणि निकोबार बेटाला मूर्ख बनवू शकणार नाही,’ असे म्हणत लोकांना सतर्क देखील केले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र खासदाराने नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी वडिधाऱ्यांना ‘भूतकाळ विसरुन जा’ असे सांगितले आणि त्यांच्यासाठी काम करण्याचे वचन देखील दिले. एनडीएला मत न देणाऱ्या समुदायांना भाजपाच्या खासदाराने लक्ष्य केल्याचे समोर आलेले हे दुसरे प्रकरण आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बिष्णू रे यांनी ५ जून रोजी हे भाषण केले होते. सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याच्या एक दिवसानंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते. अंदमान आणि निकोबार बेटांच्या एकमेव लोकसभा जागेवर भाजप खासदाराने काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा यांचा २४ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. परंतु आपले मताधिक्य घटल्याने त्यांनी हे वादग्रस्त भाषण केल्याचे सांगितले जाते.