याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा एक गट जम्मू-काश्मीर मधील उरी येथील गोहल्लान भागात घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा दलांच्या निदर्शनास आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा दलाने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि नियंत्रणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न उधळून लावला. दरम्यान सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलाची मोहीम अध्याप संपलेली नसून ती सुरुच असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न
लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंतचे विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. काश्मीर मधील लोक तेथील बदलांना समर्थन देत असल्याचे हे निदर्शक असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका येवू घातल्या आहेत. त्यासाठी मतदार यादी बनविण्याची प्रक्रियासुध्दा सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर तेथील शांतता भंग करण्यासाठी तेथील असामाजिक घटक प्रयत्न करत असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.
संविधानातील काश्मीरसंबंधातील कलम ३७० रद्द करुन जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यापासून तेथील दहशतवादी कारवाया काही प्रमाणात नियंत्रणात आल्या होत्या. परंतु काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या महिनाभरात तर या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ९ जून रोजी जम्मूतील रियासी येथे भाविकांना घेवून जाणाऱ्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.यामध्ये ९ व्यक्तींचा मृत्यु तर ३३ जण जखमी झाले होते. यानंतर कठुआ आणि डोडा येथे झालेल्या दहशतवादी घटनांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल चिंता निर्माण केली होती. यानंतर लगेचच प्रधानमंत्री मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठका घेवून काश्मीर खोऱ्यातील या दहशतवादाला थोपविण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना आदेश दिले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी चालविलेल्या मोहीमांना यश येत असून आतापर्यंत चार दहशतवाद्यांचा ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सुरक्षा दलांची ही कारवाई सुरुच आहे.