अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत बेकायदा स्थलांतरितांचे आगमन आणि निर्वासितांची हकालपट्टी हे मुद्दे मतदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची ही भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी आत्तापर्यंत गुणवत्तेवर आधारित कायदेशीर स्थलांतराला पाठिंबा दिला होता. ‘अमेरिकेत तुम्ही पदवीधर झालात, तर तुमच्या डिप्लोमाचा एक भाग म्हणून आपोआप ग्रीन कार्ड मिळाले पाहिजे. त्यात कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्याचाही समावेश असेल,’ असे ट्रम्प यांनी ‘ऑल-इन पॉडकास्ट’मध्ये सांगितले. या पॉडकास्टचे आयोजन चमथ पलिहापितिया, जेसन कॅलाकॅनिस, डेव्हिड सॅक्स आणि डेव्हिड फ्रीडबर्ग या गुंतवणूकदारांनी केले होते. या चौघांपैकी तिघे स्थलांतरित आहेत.
‘जगभरातील सर्वोत्तम आणि प्रतिभावंतांना अमेरिकेत आयात करण्यासाठी अधिक मुभा द्याल, असे आश्वासन द्या,’ या कॅलाकानिस यांच्या म्हणण्यावर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार ट्रम्प म्हणाले, की ‘असे अनेक विद्यार्थी आहेत, जे एखाद्या उच्च महाविद्यालयातून किंवा महाविद्यालयातून पदवीधर झाले आणि त्यांना येथेच राहण्याची तीव्र इच्छा होती. त्यांना इथेच एखादी कंपनी सुरुवात करायची होती. त्यांच्याकडे काही कल्पनाही होत्या; परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले. काहींना चीनला परत जावे लागले. त्यांनी आपआपल्या देशात प्राथमिक स्वरूपात कंपन्या सुरू केल्या आहेत. ते तिथे हजारो नागिरकांना रोजगार देणारे अब्जाधीश बनत आहेत आणि ते येथेही केले जाऊ शकले असते.’
‘आपण हार्वर्ड, एमआयटी, मोठ्या विद्यापिठांमधील विद्यार्थ्यांना गमावतो तेव्हा खूप वाईट वाटते असे सांगत स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रातील उच्च शिक्षण संस्थेतून पदवी घेतल्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड मिळण्याबाबत आपल्या पहिल्या टर्मच्या धोरणाचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला.
इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या ताज्या वार्षिक ओपन डोअर्स अहवालानुसार, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात २१०हून अधिक देशांतून दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतले. यामध्ये चीनमधील विद्यार्थी सर्वाधिक आहेत. त्यांची संख्या २,८९,५२६ इतकी होती. परंतु चीनमधील विद्यार्थ्यांची संख्या यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी घट झाली आहे.