या अधिवेशनासाठी भारतीय जनता पक्षाचे भर्हतृरी महताब हंगामी अध्यक्ष असणार आहेत. त्यांच्या निवडीवरून काँग्रेसने वाद निर्माण करून सरकारची वाट सोपी नसेल, याची चुणूक दाखवून दिली आहे. सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात प्रथम महताब यांना शपथ देतील. त्यानंतर महताब लोकसभेत सकाळी ११ वाजता पोहोचतील आणि त्यानंतर इतर सदस्यांना शपथ देतील.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन असल्यामुळे काही काळ मौन पाळल्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल. निवडून आलेल्या सदस्यांची यादी सभागृहात पटलावर सादर केली जाईल. महताब सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृह नेते म्हणून शपथ देतील. त्यानंतर तालिका अध्यक्षांचा शपथविधी होईल. त्यानंतर क्रमाक्रमाने मंत्रिमंडळातील मंत्री व इतर सदस्यांचा शपथविधी पार पडेल. हंगामी अध्यक्षांना शपथविधीसाठी मदत करण्यासाठी राष्ट्रपतींनी के. सुरेश (काँग्रेस), टी. आर. बालू (डीएमके), राधामोहन सिंह आणि फग्गनसिंह कुलस्ते (भाजप), सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस) यांची नियुक्ती केली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशनाला अल्पकालीन सुटी लागेल आणि त्यानंतर २२ जुलैपासून अधिवेशन पुन्हा सुरू होईल. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल.
अधिवेशनातील प्रमुख कामकाज
२४ व २५ जून – हंगामी अध्यक्षांसह नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
२६ जून – लोकसभा अध्यक्षांची निवड
२७ जून – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण
२८ जून – अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा
२ किंवा ३ जुलै – पंतप्रधान आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील