हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस म्हणतात, असं वाटतं मुख्यमंत्रीच आहे!
- काँग्रेसची टीका, फडणवीसांनी स्वप्नातून बाहेर यावं!
- पंकजा मुंडे यांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया
औरंगाबाद: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काँग्रेसनं फडणवीसांच्या त्या वक्तव्याची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘विरोधी पक्ष म्हणून फिरतानाही मला लोकांचं प्रचंड प्रेम मिळतंय. ते पाहून मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं,’ असं वक्तव्य फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना आज केलं. त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ‘फडणवीसांचे अनेक प्रयत्न फसल्यानंतरही ते स्वप्नातून बाहेर यायला तयार नाहीत. पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीनं अशी विधानं करणं हास्यास्पद आहे. त्यांनी वास्तव स्वीकारायला हवं,’ अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
वाचा: फडणवीसांना अजूनही CM असल्यासारखं वाटतं; काँग्रेस म्हणते…
औरंगाबादमध्ये ओबीसीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या पंकजा मुंडे यांनाही पत्रकारांनी फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘चांगली आणि आनंद गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या.
राज्यात २०१४ साली भाजपची सत्ता आल्यानंतर फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. त्यावेळी पंकजा यांच्यासह अनेक नेते शर्यतीत होते. ती संधी हुकल्यामुळं पंकजा त्यावेळी नाराज झाल्या होत्या. ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे’ असं त्यावेळी त्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या होत्या. फडणवीसांच्या आजच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारताना पत्रकारांनी पंकजांचं लक्ष त्या विधानाकडं वेधलं. त्यावर पंकजा यांनी स्मित केलं. ‘जनतेच्या मनातला’ हा शब्द तुम्ही खेचू शकत नाही’, असं त्या मिश्किलपणे म्हणाल्या.
वाचा: बंदच्या दिवशी शिवसेनेच्या लोकांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खाल्ली; नीलेश राणेंचा आरोप