१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने झाली. प्रोटेम स्पीकरने भर्तृहरी महताब यांनी सर्वात आधी पंतप्रधान मोदींनी शपथ दिली आणि त्यानंतर सभागृहातील इतर खासदारांना देखील शपथ दिली.
पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर एनडीए सरकारचे मंत्री आणि राज्य मंत्री यांचा शपथविधी पार पडला. यानंतर केंद्रशासित राज्यांच्या खासदारांना शपथ देण्यात आली. तर इतर खासदारांना राज्यनिहाय क्रमाने व्यासपीठावर येण्याचे सांगून शपथ देण्यात आली. यादरम्यान रकीबुल हुसैन यांना देखील अध्यक्षांनी शपथ दिली. त्यांनी आपल्या वेगळ्या अंदाजात संविधानाची प्रत हातात ठेवून अल्लाहच्या नावाने शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांनी उर्दु भाषेत शपथ घेतली.
रकीबुल हुसैन हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेले खासदार आहेत. धुबरी मतदारसंघातून ते १४ लाख ७१ हजार मतांनी विजयी होऊन त्यांनी हा विक्रम केला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अजमल यांना केवळ ५९ हजार ४०९ मतांवर समाधान मानावे लागले आहे. आसाममधील सामगुरी विधानसभा मतदारसंघातून रकीबुल हुसैन हे पाच वेळा आमदार देखील राहिले आहेत. काँग्रेसने आपल्या तगड्या शिलेदाराला मैदानात उतरवून परफ्यूम व्यावसायिक आणि AIUDF नेते बदरुद्दीन अजमल यांना मात दिली आहे.
दरम्यान अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. हातात संविधानाची प्रत घेऊन सर्वांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात केली. प्रोटेम स्पीकर आणि नीट पेपर लीक प्रकरणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला घेरले होते.