लोकसभा निकालांनंतर विरोधकांना सत्ता स्थापन करण्याइतपत बहुमत मिळाले नसले तरी एक मजबूत विरोधक म्हणून त्यांनी आपले स्थान नक्कीच बळकट केल्याचे दिसत आले. त्याची प्रचिती सोमवारी खासदारांच्या शपथविधीदरम्यान आली. लोकसभेचे अस्थायी अध्यक्ष भर्तुहरि महताब हे सोमवारी सर्व सदस्यांना शपथ देत आहेत. प्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ ग्रहण केली. यावेळी सत्ताधारी पक्षाने ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. याचदरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे शपथविधीसाठी उभे राहताच विरोधकांनी ‘नीट नीट’ ची घोषणाबाजी सुरु केली. लोकसभेच्या सामान्य कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्यास सुरुवात केली आहे. सभागृहातील या घोषणाबाजी मध्येच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खासदारकीची शपथ घेतली.
नीट-नेटचा वाद..शिक्षणमंत्र्यांचे घूमजाव..ते पेपरफूटी विरोधी कायदा
मे महिन्यामध्ये पार पडलेल्या नीट परिक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला होता. या परिक्षेमध्ये अव्वल आलेल्या ६७ विद्यार्थ्यांमध्ये ७२० पैकी ७२० गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्राचे होते. अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. परंतु या बाबत शिक्षणमंत्र्यांना जेंव्हा विचारणा करण्यात आली तेंव्हा त्यांनी परिक्षेमध्ये घोटाळा व पेपरफुटीच्या घटनांचे कोणतेही पुरावे नसल्यांचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमधून मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर लगेचच आपल्या वक्तव्यात घूमजाव करुन असे प्रकार घडले असल्याचे मान्य करत शिक्षणमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घेतली होती.
पुन्हा एनटीए कडून घेतली जाणाऱ्या युजीसी नेट परीक्षेमध्ये सुद्धा अनियमितता असल्याचे कारण सांगत शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा अचानक रद्द केली. विरोधी पक्षांनी परीक्षांमधील घोटाळ्यांचा व पेपरफूटीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला. याचा परीणाम म्हणून सत्ताधारी एनडीएने रातोरात पेपरफूटीच्या घटना रोखण्यासाठी ‘सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध अधिनियम २०२४ अंमलात आणला असून त्याची अंमलबजावणी २१ जून पासून लागू करण्यात आली आहे.
सोमवारी पंतप्रधान मोदी यांनीही आपल्या शपथविधीनंतरच्या भाषणात म्हटले की, सरकार चालवायला बहुमत लागते पण परंतु देश चालवण्यासाठी सहमती लागते. यावेळी ते पुढे म्हणाले की आम्ही सर्वांच्या सहमतीने लोकांची सेवा करु. त्यामुळे येणाऱ्या काळात विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याचा सामना सत्ताधारी एनडीएला करावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे.