काय आहे प्रकरण?
लॉरेन्स व्हॅन वॅसेनहोव असे या महिलेचे नाव आहे. अपंगत्वामुळे आपण कंपनीकडे बदली मागितली होती. कंपनीने बदली दिली. मात्र, त्यानंतर कोणतेही काम दिले गेले नाही. केवळ पूर्ण पगार दरमहा देण्यात येत होता. हा क्रम २० वर्षे चालला, असे वॅसेनहोव यांनी तक्रारीत म्हटले आहे. वॅसेनहोव सन १९९३मध्ये कंपनीत रूजू झाल्या. मात्र, नंतर पक्षाघाताचा झटका आल्यामुळे त्यांना अंशत: अपंगत्व आले. त्यामुळे कंपनीने त्यांना त्यांच्या शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन मनुष्यबळ विभागात नियुक्ती दिली. मात्र, फ्रान्समधील दुसऱ्या विभागात बदली करण्याची विनंती वॅसेनहोव यांनी केली. ती मान्य केली गेली. बदलीच्या ठिकाणी आपल्या मर्यादा लक्षात घेऊन योग्य काम देण्याऐवजी आपल्याला बसवून ठेवण्यात आले. या काळातील पगार आपल्याला देण्यात आला. मात्र, कंपनीच्या कृतीमुळे व्यावसायिक प्रगती खुंटली, असा आरोप महिलेने केला आहे.
कंपनीने फेटाळले आरोप
वॅसेनहोव यांचे आरोप कंपनीने फेटाळले आहेत. त्यांच्या शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन त्यांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यांची बदलीची विनंतीही मान्य करण्यात आली. मात्र, त्या वारंवार आजारपणाची रजा घेत असल्यामुळे त्यांना नियमित जबाबदारी सोपवणे शक्य झाले नाही, अशी भूमिका कंपनीने न्यायालयात मांडली.