बीजेडीनं गेल्या १० वर्षांमध्ये मोदी सरकारला बरीच मदत केली. अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर त्यांनी सरकारला सहकार्य केलं. राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्यानं बीजेडीनं त्यांना कायम मदतीचा हात दिला. बीजेडीच्या सहकार्यामुळेच राज्यसभेत सरकारला अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात यश आलं. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओडिशात भाजपनं बीजेडीचा पराभव केला. त्यामुळे तब्बल २४ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नवीन पटनायक यांना पायउतार व्हावं लागलं. यानंतर बीजेडीनं भाजपला आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे.
माजी मुख्यमंत्री पटनायक यांनी सोमवारी भुवनेश्वरमध्ये राज्यसभेच्या नऊ खासदारांची बैठक घेतली. केंद्र सरकारला राज्यसभेत घेरण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली. राज्याचा विकास आणि ओडिशातील नागरिकांचं कल्याण या दोन गोष्टींवर भर द्या. आपल्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील ४.५ कोटी लोकांचा आवाज व्हा आणि संसदेत बाजू मांडा, अशा सूचना पटनायक यांनी केल्या.
बीजेडीनं घेतलेली आक्रमक भूमिका भाजपसाठी धक्का मानला जात आहे. गेल्या १० वर्षांत बीजेडी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसनं राज्यसभेत भाजपला साथ दिली. २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अश्विनी वैष्णव (विद्यमान रेल्वेमंत्री) यांना निवडून आणण्यात बीजेडीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. दिल्ली सेवा विधेयक मंजूर करण्यात, मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव हाणून पाडण्यात, ट्रिपल तलाक या सगळ्यांमध्ये बीजेडीनं भाजपला सहकार्य केलं.
मे-जूनमध्ये ओडिशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपनं राज्यातील २१ पैकी २० जागा जिंकत बीजेडीला पराभवाचा धक्का दिला. विधानसभा निवडणुकीतही भाजपनं सत्ताधारी बीजेडीला धूळ चारली. मुख्यमंत्री पटनायक यांचा भाजपच्या लक्ष्मण बाग यांनी पराभव केला. बीजेडीला १४७ पैकी केवळ ५१ जागा मिळाल्या. पाच वर्षांपूर्वी बीजेडीनं ११२ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपनं ७८ जागा जिंकत ओडिशात पहिल्यांदाच सरकार स्थापन केलं.