झांगचा जन्म हा प्रिमॅच्युअर होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना सांगितलं की त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. झांग याला रुग्णालयाच्या संचालकाच्या नातेवाईकाला देण्यात आलं, ज्यांना मूल होत नव्हतं.
आर्थिक परिस्थितीमुळे १७ व्या वर्षी शाळा सोडली
झांग झेजियांग येथून ४०० किमी लांब राहातो, ज्यांनी त्याला दत्तक घेतलं त्यांचं वय ५० वर्ष होतं आणि त्याचे वडील हे अपंग होते. त्यामुळे झांग हा लहानपणीपासूनच अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत वाढला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला वयाच्या १७ व्या वर्षी शाळा सोडावी लागली. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या दत्तक घेतलेल्या आईने त्याला सांगितलं की ते त्याचे खरे आई-वडील नाहीत. त्यानंतर झांग गेल्यावर्षी आपल्या खऱ्या आई-वडिलांना भेटला. त्यासाठी त्याने पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर झेजियांगमध्ये सोहळा साजरा झाला.
वडिलांकडून लेकाला १.३८ कोटी रुपये
३३ वर्षांनी लेकाची भेट घडल्याने झांगच्या आईला रडू कोसळलं, त्यांनी लेकाला मिठीत घेतलं. तर झांगच्या वडिलांनी त्याला १.२ मिलियन युआन म्हणजेच जवळपास १.३८ कोटी रुपये असलेलं बँक अकाऊंटचं कार्ड दिलं. झांग या दाम्पत्याचं दुसरं अपत्य आहे.
जन्मानंतर मृत्यू झाल्याचं सांगितलं अन् दुसऱ्याला दत्तक दिलं
जेव्हा झांगचा जन्म होणार होता तेव्हा या जोडप्याचा पहिला मुलगा हा वर्षभराचा होता. त्याचा जन्म सिझेरियन पद्धतीने झाला होता. जेव्हा झांग त्याच्या आईच्या गर्भात होता तेव्हा सहाव्या महिन्यातच त्यांचे टाके तुटले आणि प्रिमॅच्युअर बाळाचा जन्म झाला. डॉक्टरांनी त्याच्या जन्माच्या काहीच वेळाने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
गरिबीत आयुष्य काढल्यानंतरही झांग एक व्यवसाय सांभाळत आहे. तो एका कारखान्याचा मालक आहे आणि त्याला ९ वर्षांचा एक मुलगाही आहे.