या मीममुळे जयपूर पोलिसांची चर्चा होत आहे. विश्व चषक २०२४ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याबाबत तयार करण्यात आलेल्या या मीममध्ये भारतीय खेळाडूंना पोलिसांच्या वर्दीत दाखवण्यात आलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्रेविस हेडला आरोपी सारखं दाखवण्यात आलं आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि विराट कोहली दिसत आहेत.
१९ नवंबर से तलाश रहे थे… ट्रेविस हेड आरोपी
हे मीम जयपूर पोलिसांच्या ऑफीशिअल एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर क्रिकेट चाहते भडकले. या मीममध्ये ट्रेविस हेडला आरोपी दाखवत ‘१९ नवंबर से तलाश रहे थे अब जाकर पकड में आया’ (१९ नोव्हेंबरपासून शोधत होतो आता कुठे ताब्यात आला आहे) असं लिहिलेलं होतं.
जयपूर पोलिसांनी एक दिवसापूर्वीच परदेशी महिलांसोबत असभ्य वर्तन करताचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका तरुणाला अटक केली होती. पण, आता त्याच जयपूर पोलिसांनी आंतराष्ट्रीय क्रिकेटरवर याप्रकराचं मीम शेअर केल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली. जयपूर पोलिसांचं हे कसं अतिथि देवो भव:, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होऊ लागला.
वाद वाढताना पाहून जयपूर पोलिसांनी ही पोस्ट डिलीट केली. या मीमला शेअर करताना ‘किसी दिन ये तमाशा मुस्कुराकर हम भी देखेंगे’ असं कॅप्शन देण्यात आलं होतं. पण, या पोस्टबाबत एडिशनल पोलिस आयुक्त कैलाश बिश्नोई यांनी स्पष्ट केलं की, याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती, सोशल मीडियासाठी एक वेगळी टीम आहे. याबाबत ते माहिती घेत आहेत.
टी-२० विश्व चषकात भारताने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी पराभूत करत १९ नोव्हेंबर २०२३ च्या विश्वचषक फायनलचा बदला घेतला. या सामन्यात रोहित शर्माने भारतासाठी ९२ धावा केल्या तर ट्रेविसने ऑस्ट्रेलियासाठी ७६ धावा केल्या होत्या. यावर जयपूर पोलिसांनी मीम शेअर केलं होतं.