ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी त्यांच्या स्वागत प्रस्तावात खासदारांच्या निलंबनाच्या मुद्यावरुन टीका केली. त्यामुळे विरोधीपक्ष वरचढ ठरताना दिसला. तर, काहीच वेळात संपूर्ण गेम फिरल्याचं चित्र सदनात पाहायला मिळालं. जेव्हा ओम बिर्ला यांनी आणीबाणीचा विषय काढला तेव्हा विरोधकांचा एकच गोंधळ उडाला. इतकंच नाही तर सदनात दोन मिनिटांचं मौनही ठेवलं.
ओम बिर्ला यांच्या निवेदनादरम्यान सदनात गदारोळ
हे सदन १९७५ मध्ये देशात आणीबाणी लावल्याच्या निर्णयाची कठोर शब्दात निंदा करतं. तसेच, या काळात ज्यांनी आणीबाणीला विरोध केला, संघर्ष केला त्यांचं कौतुक करतं. त्यांनी भारताच्या लोकसभेच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्ण केली, असं ओम बिर्ला आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर सदनात विरोधांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ओम बिर्ला यांचं भाषण सुरु असतानाच विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. तरी ओम बिर्ला यांनी त्यांचं भाषण सुरु ठेवलं.
भारताच्या इतिहासातील काळा अध्याय
भारताच्या इतिसाहात २५ जून १९७५ च्या त्या दिवसाला काळा अध्याय म्हणून ओळखला जाईल. या दिवशी तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे निर्मित संविधानावर प्रहार केला. भारत हा लोकशाहीची जननी म्हणून जगात ओळखला जातो. भारतात नेहमी लोकशाहीच्या मुल्यांचा आणि वाद-संवादाचं समर्थन झालं आहे. नेहमी लोकशाहीच्या मुल्यांची सुरक्षा आणि त्याला प्रोत्साहित केलं. अशा भारतावर इंदिरा गांधी यांच्याद्वारे हुकुमशाही लादण्यात आली. भारताच्या लोकशाही मुल्यांची अवहेलना करण्यात आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गळा घोटण्यात आला, असं ओम बिर्ला म्हणाले.