मुंबईच्या जोगेश्वरीतील ओशिवरा येथे अशफाकचे चुनावालाचे बालपण गेले. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला दहावीनंतर शिक्षण सोडावे लागले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याला स्वत:च्या खांद्यावर घ्यावी लागली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने एका किराणा दुकानात १५०० रुपये मासिक पगारावर काम करण्यास सुरुवात केली. या बिकट परिस्थितीसमोर तो कधीच झुकला नाही. तर नेहमीच आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहिला.
आव्हानांना झेलुनही अशफाकला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा इतकी प्रबळ होती की, मनाप्रमाणे काम नसल्याने त्याने १० वर्षांतच त्याने अनेक कंपन्यांमध्ये नोकऱ्या बदलल्या आणि स्किनकेअर स्टोअरमध्ये मॅनेजर झाला. दिवस पुढे सरत होते पण अशफाकला आशेचा किरण काही दिसेना. २०१३ सालच्या एके दिवशी त्याची नजर राईड हेलिंग अॅपवर पडली. आणि हाच त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा अॅप ठरला. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही फक्त आपल्याकडे संयम असला आणि योग्य वेळी आपलं काम हेरलं की सफलता मिळवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. अशफाकच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. राईड हेलिंग अॅपवर या कॅब सर्व्हिस कंपनीत तो अर्धवेळ चालक म्हणून रुजू झाला.
येथे काम करतानाही अशफाकसमोर दैनंदिन आव्हान होतेच. तो सकाळी ७ वाजता कॅब घेऊन निघायचा आणि १० वाजेपर्यंत कॅब चालवायचा. यानंतर तो स्किनकेअर स्टोअरमध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करायचेा. येथील काम आटोपताच तो पुन्हा कॅबचे स्टेरिंग आपल्या हातात घ्यायचा. याच काळात अश्फाकने चांगली कमाई सुरू केली होती. स्किनकेअर स्टोअरमधून त्याला दरमहा ३५ हजार रुपये तर कॅब कंपनीकडून १५ हजार रुपये कमावत होता. यामधून अश्फाकला आर्थिक बळ मिळाले आणि त्याने लोनवर स्वत:ची गाडी खरेदी केली.
ही त्याच्या सफलतेच्या मार्गातील फक्त सुरुवात होती. त्याच्या बहिणीनेही त्याला आर्थिक पाठबळ दिले आणि त्याने त्यातून आणखी एक कार खरेदी केली. त्याने त्या कारसाठी ड्रायव्हर लावला अशाप्रमाणे त्याच्या उत्पन्नाचे आणखी स्त्रोत वाढत गेले. आपल्या वाहनांच्या ताफ्यात आणखी भर घालून मोठा व्यवसाय करण्याचे त्याने निश्चित केले. यासाठी त्याने बँकेकडून दहा लाखांचे कर्ज घेतले आणि आणखी तीन गाड्या वाहनांच्या ताफ्यात मिळवल्या. अश्फाककडे अशाप्रकारे वाहनांची संख्या वाढत गेली आणि त्याने चालकांकर्वी त्याचा व्यवसाय केला.
अशफाकसाठी ही मोठी संधी तर होतीच पण इथेही आव्हानांनी त्याची पाठ सोडली नाही. त्याने घेतलेल्या कर्जाचे ईएमआय वाढत होते आणि त्यामुळे अनेक वाहनांची व्यवस्थापन करण्याचे आव्हान होते. पण तरीही त्याने हार मानली नाही. सर्व ईएमआय भरुन तो खर्चासाठी एक छोटी रक्कम स्वत:कडे ठेवायचा आणि उर्वरित पैसे पुन्हा गुंतवायचा. या आव्हानांचा डोंगर सर करुन अशफाकने काही वेळातच ४०० वाहनांचा ताफा तयार केला.
वास्तविक, देशात कोविड महामारीमुळे लॉकडाऊन लागला आणि सर्व व्यवसाय ठप्प झाले. जी वाहने कालपर्यंत रस्त्यावर पूर्ण वेगाने धावत होती, ती आता बेवारसपणे एकाच जागी उभी होती. सगळीकडे निराशेचे वातावरण होते. पण अशफाक या संकटात ही तग धरुन उभा राहिला. लॉकडाऊन संपताच त्याने आपल्या वाहनांच्या चाकांना पुन्हा गती दिली. या यशानंतर अशफाक सांगतो की, त्याची ध्येयाच्या वाटेवरची पावलं आता मुळीच थांबणार नाहीत आणि लवकरच त्याच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५०० पर्यंत नेण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.