दोन वर्षांपूर्वी अधिकाऱ्यांच्या अपेक्षेनुसार हिजाब न घातल्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या महसा अमिनीच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. तर तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळेच मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. अमिनीच्या मृत्यूनंतर देशभरात संताप उफाळून आला. महिलांनी अनेक महिने रस्त्यावर उतरून लढा दिला. आंदोलन मोडून काढताना रक्तपात झाला. मृत्यूच्या वेळी रस्त्यावरून पोलिस गायब होत असत. मात्र, त्यानंतर महिलांना झालेली मारहाण, व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसवून केलेले अत्याचार, गंभीर शिक्षांचे व्हिडीओ आता उपलब्ध झाले होते. डोके झाकण्यास नकार दिल्याबद्दल अधिकाऱ्यांनी हजारो गाड्या जप्त केल्या आणि त्यांना सेवा देणाऱ्या व्यवसायांनाही लक्ष्य केले.
इराणमधील या हिजाबवादानंतर आता पुन्हा या विषयाचा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. हिजाबसक्ती, ज्याला आता पोलिस नूर किंवा ‘लाइट प्लॅन’ म्हणत आहेत. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू होण्यापूर्वी हा सक्तीचा नवा प्रकार सुरू झाला आणि आता नव्याने त्यांची जागा घेणारेही याबाबत कसे धोरण अवलंबतात, ते किती तीव्र असेल �आणि त्यानंतरच्या अशांततेला इराण कसा प्रतिसाद देते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘नूर’ योजना आम्हाला पुन्हा एकदा अंधारात नेईल, अशी भूमिका सुधारणावादी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार मसूद पेझेश्कियान यांनी अलीकडेच महिला समर्थकांशी बोलताना मांडली होती. एप्रिलमध्ये ‘नूर’च्या अंमलबजावणीचा वेग वाढू लागला. ऑनलाइन प्रसारित झालेल्या व्हिडिओंमध्ये महिलांशी पोलिसांची हिंसक चकमक होत असल्याचे दिसून आले.
पोलिसही कंटाळले
पोलिसांनी याप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या जाहीर केली नाही. माध्यमांनीही याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. मात्र, तरीही इराणमध्ये त्याची व्यापक चर्चा आहे. परंतु तेहरानमध्ये फिरताना अनेक महिला त्यांचे हिजाब सैलसर घालतात किंवा त्यांना त्यांच्या खांद्यावर लपेटून ठेवतात. उत्तर तेहरानमध्ये नुकतेच एका दुपारी, महिला कॅफे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बसल्याचे दिसले. ५० वर्षांच्या एका पोलिस अधिकाऱ्याने महिलांना कृपया हिजाब घाला, असे म्हटले. तसेच या संघर्षाला कंटाळलो असल्याची प्रतिक्रिया दिली. ‘पोलिसही महिलांशी लढण्यास उत्सुक नाहीत, परंतु त्यांच्यावर दबाव आहे’, असे फतेमेह या ३४ वर्षीय गणिताच्या शिक्षिकेने म्हटले आहे.