मिळालेल्या माहितीनुसार, डुंगरपूर पोलिस ठाण्याचे एसएचओ गिरधारी सिंह यांनी सांगितलं की दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या सात विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये १५ मे रोजी ३०० वेळी उठाबशा काढायला लावल्या. इतक्या उठाबशा काढल्याने विद्यार्थ्याच्या किडनीवर दबाव आला. त्यामुळे त्याच्या किडनीमध्ये इंफेक्शन झालं. यानंतर पीडित विद्यार्थ्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात आठवडाभर भर्ती राहावं लागलं. यादरम्यान त्याला चारवेळी डायलिसिस करावं लागलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो १५ जूनला पुन्हा कॉलेजमध्ये जायला लागला आहे.
आरोपी विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल
याप्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांनी आरोपी विद्यार्थ्यांविरोधात मंगळवारी तक्रार दाखल केली. कॉलेजच्या अँटी रॅगिंग कमिटीच्या तपासात हे विद्यार्थी दोषी आढळल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्याने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी त्याची रॅगिंग केली.
यापूर्वीही त्याची रॅगिंग करण्यात आली होती. पण, त्याने याबाबत कुठलीही तक्रार केली नव्हती. जेव्हा कॉलेज प्रशासनाला २० जूनला ऑनलाईन एक तक्रार मिळाली तेव्हा हे प्ररकण समोर आलं. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने तपास केला. याप्रकरणात त्या सात विद्यार्थ्यांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.