९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथील खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. युरॉलॉजी अर्थात मूत्रविकारासंबंधी आजारांवर डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांना नेमका कसला त्रास होत आहे, याविषयी माहिती मिळालेली नाही.
प्रकृतीविषयी अपडेट
“लालकृष्ण अडवाणी यांना एम्स नवी दिल्ली येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत” असे एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिक तपशील न देता सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वयोमानापरत्वे जडलेल्या आरोग्याच्या समस्यांवर ते उपचार घेत असल्याची माहिती आहे.
‘भारतरत्न’ने सन्मानित
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अलिकडेच म्हणजे ३० मार्च २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले आहे.
वयाच्या शंभरीकडे वाटचाल
अडवाणींचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची (आता पाकिस्तानात) येथे झाला. १९४२ मध्ये अडवाणींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. अल्पावधीतच ते भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व ठरले.
भाजपात प्रमुख पदं
लालकृष्ण अडवाणी यांनी १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८ आणि पुन्हा २००४ ते २००५ या कालावधीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेपासून त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून प्रदीर्घ कार्यकाळ भूषवला.
वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान
अडवाणींची संसदीय कारकीर्द जवळपास तीन दशकांची होती. १९९९ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार वाहिला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मोठ्या मनाचा नेता
२००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जात होते. २००९ च्या निवडणुका काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जिंकल्या, मात्र अडवाणींनी सुषमा स्वराज यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते करण्याचा मार्ग मोकळा केला होता.