चीनची भारताच्या जमिनीवर पाय रोवण्यास सुरुवात; कठोर पावलं टाकली नाही तर…: शिवसेना

हायलाइट्स:

  • जम्मू- काश्मीरमध्ये तणाव
  • पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर चीनसोबत तणाव
  • शिवसेनेने दिला हा धोक्याचा इशारा

मुंबईः ‘चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करत आहेत, व आपण चर्चेच्या फेऱ्या मोजत बसलो आहोत. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ‘अलोकशाही’ राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. भारताने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आपल्या अस्तित्वालाच आव्हान देतील,’ असा धोक्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं (Shivsena) काश्मीरमधील दहशतवादी कारवायांबाबत भाष्य केलं आहे.

‘या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले? हा प्रश्नच आहे. उलट अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तान जास्तच शिरजोर झाला आहे व त्यामुळेच कश्मीर खोऱ्यांतील हिंसाचार वाढला आहे. मोदींचे सरकार असताना कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरु व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही. दहशतवादाच्या भयाने कश्मीरात लोक थांबायला तयार नाहीत. आपली घरेदारे, जमीनजुमले मागे टाकून पळत आहेत. या सगळ्या लोकांचे दुःख पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः पुण्यातील घटनेवर अजित पवारांचा संताप; ही राक्षसी वृत्ती ठेचलीच पाहिजे!

‘एकाच वेळी पाच जवानांना कंठस्नान घातले जाते. निरपराध हिंदू पंडितांना, कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांना मारले जाते. त्याचा बदला घेतला नाही तर आपल्या भूमीवर सांडलेले रक्त आणि अश्रू वायाच गेले असे होऊ नये. इतर देशांत असे घडले असते तर त्या देशाने सैनिकांच्या हत्येचा बदला लगेच घेतला असता. आता निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळही खेळता येत नाहीत,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

‘उत्तराखंडमधील बाराहोती क्षेत्रात, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनने सरळ सरळ घुसखोरी केली आहे. यांगत्झे भागात दोन देशांचे जवान मागच्याच आठवडय़ात समोरासमोर आले व गलवान व्हॅलीप्रमाणे रक्तपाताची पुनरावृत्ती होते की काय अशी स्थिती निर्माण झाली. हे प्रकार वाढले आहेत व चीन कोणताही करारमदार पाळायला तयार नाही. चीनचे अधिकारी चर्चेला बसतात, चर्चा लांबवतात, पण शेवटी त्यांना हवे तेच करतात,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः ‘मोदींच्या बदनामीचा सुनियोजित कट रचला जातोय’; भाजपचा आघाडीवर आरोप

‘कोणत्याही रचनात्मक सुधारणा मान्य करायला चीन तयार नाही. पूर्व लडाखवर चीन त्याचा हक्क सांगतो व चीनने मुजोरपणाने एकतर्फी घुसखोरी केली आहे. चीन हा एक नंबरचा साम्राज्यवादी आहे. साम्राज्यवादी असायला हरकत नाही, पण सभ्यता, सुसंस्कृतपणाशी चीनचा उभा दावा असल्याने त्याच्या साम्राज्यवादी विचारांना गल्ली गुंडगिरीचा माज आहे. चीन त्याच्या विस्तारासाठी शेजारच्या राष्ट्रांतील दहशतवादास पाठिंबा देतो. चीन अमली पदार्थांच्या व्यापारास पाठिंबा देतो. चीन शेजारी राष्ट्रांतील अंतर्गत झगड्यात नाक खुपसून माओवाद विस्तारायच्या नावाखाली शस्त्रास्त्र व अर्थपुरवठा करतो. चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः खळबळजनक! पाक, यूपीतील हॅकर्सनी केला पोलिस अधिकाऱ्याचा ईमेल हॅक

Source link

5 jawans martyredchina borderjammu kashmirterrorist killed in kashmirजम्मू- काश्मीर५ जवान शहीद
Comments (0)
Add Comment