ब्रिटिशांनी नवी दिल्लीची निर्मिती करताना रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना नाले खोदले होते. त्यातून पावसाचे पाणी यमुनेत जाईल, याची व्यवस्था केली होती. त्यानंतरच्या शतकात ती व्यवस्था मोडकळीस आल्याने थोडा जास्त पाऊस झाला की ड्रेनेज यंत्रणाच कोलमडते व दिल्लीच्या रस्त्यांची तळी बनतात. शुक्रवारी सकाळीही जोरदार पाऊस झाल्यानंतर दिल्लीच्या अनेक भागांत वाहतुकीला फटका बसला. मेट्रो स्थानकात व सभोवती पाणीच पाणी झाल्याने सकाळीच यशोभूमी द्वारका सेक्टर २५ व अन्य काही मेट्रो स्थानके बंद करण्यात आली.
या पावसामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून अत्यल्प दिलासा मिळाला असला तरी सकाळी कामावर जाताना व सायंकाळी घरी परतताना लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिल्लीत गल्ल्या-रस्ते, नेत्यांच्या वस्त्या आणि बंगले पाण्याखाली गेले. दिल्ली सरकारच्या पाणीपुरवठा मंत्री आतिषी यांच्याबरोबरच अनेक खासदारांच्या बंगल्यांनाही पाण्याने वेढा दिला. समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांच्या निवासस्थानाबाहेरील परिसर जलमय झाल्याने यादव यांना दोन जणांनी कारपर्यंत उचलून नेले.
दरम्यान, पावसामुळे रस्त्यांच्या नद्या झाल्याने सामान्यांच्या हालास पारावार उरला नाही. संसदेपासून हाकेच्या अंतरावरील नॅशनल मीडिया सेंटरभोवती दिवसभर नदीसारखे दृश्य होते. अतिशय वर्दळीच्या आयटीओ चौकातील वाहतूक कोंडी रात्री उशीरापर्यंत कायम होती. संपूर्ण कॅनॉट प्लेस, आझाद मार्केट, एम्स परिसर, वसंत कुंज, विमानतळ परिसर, चित्तरंजन पार्क, मंडी हाऊस, अशोक, अकबर, पंडित पंत आदी रस्ते, नॉर्थ व साऊथ एव्हेन्यू, वीर बंदा बैरागी मार्ग आणि धौला कुआ यासह अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. मिंटो रोडवरील अंडरपास ३ तास पाण्याने गच्च भरला होता. त्यात काही कार पूर्णपणे बुडाल्या होत्या. काही भागांत बसेसही पाण्यात अडकल्याने प्रवास करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली. सुभाष मार्केट व काही भागांत दोरीच्या साहाय्याने एक एक करून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
२४ तासांत २२८ मिमी पाऊस
दिल्ली परिसरात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तीन-चार तासांत सफदरजंग हवामान केंद्रात १५३.७ मिमी पावसाची नोंद झाली. दिल्लीत गुरुवारी सकाळी साडेआठपासून पुढच्या २४ तासांत २२८ मिमी पाऊस झाला, असा दावा भारतीय हवामान खात्याने केला. जून महिन्यात एकाच दिवसात इतका पाऊस होण्याची गेल्या ८८ वर्षांतील ही पहिली वेळ आहे. यापूर्वी जून १९३६ मध्ये २४ तासांत २३५.५ मिमी पावसाची नोंद झाली होती.