ज्योतिषशास्त्रानुसार आपला जन्म ज्या दिवशी होतो त्याचा प्रभाव आपल्या स्वभावावर पडतो. शास्त्रात असेही सांगितले आहे की तुमचा जन्मवाराचा तुमच्या स्वभावार आणि नशिबावर प्रभाव असतो. शास्त्रानुसार प्रत्येक वार हा एका ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे त्या ग्रहातील गुण-दोषाचा प्रभाव त्या व्यक्तीवर होणे सहाजिकच आहे. तुमचा जन्म कोणत्या वारी झालेला आहे. वारानुसार तुमचा स्वभाव किंवा तुम्ही कसे आहात ते समजते.पाहूया सोमवार ते रविवारी जन्मलेले व्यक्ती कशा आहेत?
सोमवार
सोमवारी ज्या लोकांचा जन्म झालेला आहे त्यांच्यावर चंद्राचा प्रभाव असतो. या व्यक्ती बुद्धिमान आणि शांत स्वभावाच्या असतात. हे लोक आपल्या गोड बोलण्याने इतर लोकांना सहज आकर्षित करू शकतात. हे खूप संवेदनशील आणि प्रेमळ देखील असतात. वादविवादापासून ते नेहमी दूर राहतात. यांचे व्यक्तीमत्त्व सुंदर आणि आकर्षक असते मात्र यांचे मन चंचल असते. चंद्राच्या कला ज्या प्रमाणे बदलतात त्याचप्रमाणे या लोकांचा स्वभाव बदलत असतो. कोणत्याही एका कल्पनेवर जास्त काळ ते टीकून राहू शकत नाही. स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम असतील पण अति भावनिकतेमुळे त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. सोमवारी जन्मलेले लोक त्यांच्या आईच्या खूप जवळ असतात.
मंगळवार
मंगळवारी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव असतो त्यामुळे अशा व्यक्तींचा स्वभाव गुंतागुंतीचा असतो, इतरांच्या कामात ते कायम दोष शोधत असतात. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती शूर असतात, त्या कायम युद्धासाठी तयार असतात आणि त्यांना युद्ध करायला खूप आवडतं. त्या आपल्या शब्दावर ठाम राहतात आणि काहीही झालं तरी त्यांच्यासाठी कुटुंब हे त्यांचं सर्वस्व असतं. कुटुंबाच्या सुखासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात. बऱ्याचदा सर्वसामान्य लोकांमध्ये हा गैरसमज असतो की, मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींना मंगळ दोष असतो पण हे खरे नाही. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचा मंगळ दोषाशी काहीही संबंध नाही. कुंडलीत मंगळाच्या स्थितीवरून मंगळ दोष ठरवला जातो.
बुधवार
बुधवारी जन्मलेल्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. बुध हा वाणीचा अधिपती असल्यामुळे या व्यक्ती खूप बोलतात. लोकांना अनेक प्रश्न विचारण्याची त्यांना सवय असते. बुधवारी जन्मलेल्या लोकांचा दृष्टिकोन खूप व्यावहारिक असतो. त्यांना प्रवास करायला आवडते आणि त्यांना एकाच ठिकाणी राहणे कठीण जाते. तथापि, बुधवारी जन्मलेले लोक नवीन गोष्टी शिकण्यात, नवीन भाषा शिकण्यात खूप रस दाखवतात. त्याला अनेक भाषांचे ज्ञानही असू शकते. या व्यक्ती इतर लोकांवर सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत, परंतु एकदा एखाद्या व्यक्तीने त्यांच्या मनात स्थान निर्माण केले की ते आयुष्यभर त्या व्यक्तीचे ऋणी असतात.
गुरुवार
ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो त्यांच्यावर बृहस्पति ग्रहाचा प्रभाव असतो. या लोकांना आयुष्यात नेहमीच काहीतरी मोठं करायचं असतं. या व्यक्ती जीवनात कायम सकारात्मक बाजूकडे लक्ष देतात. गुरुवारी जन्मलेले लोक खूप चांगले सल्लागार असतात. या लोकांना अध्यात्मिक कार्यात खूप रस असतो. इतरांना उपदेश करण्यात हे लोक नेहमी पुढे असतात. इतर लोकांकडून आदर आणि प्रसिद्धी मिळवण्याची या लोकांची तीव्र इच्छा असते. तीच दिनचर्या आणि तेच काम करून त्यांना खूप कंटाळा येतो.
शुक्रवार
ज्या लोकांचा जन्म शुक्रवारी झालेला आहे त्यांच्यावर शुक्राचा प्रभाव असतो. या व्यक्ती इतरांना पटकन आकर्षीत करतात. या व्यक्ती स्वतःला कायम कम्फर्ट झोनमध्ये ठेवतात. नाचणे, गाणे, फॅशन करणे, दागिने घालणे, मौजमजा यामध्ये या लोकांचा जास्त कल असतो. प्रवास करायला या लोकांना खूप आवडतो. जीवनाचा पूर्ण आनंद कसा घ्यायचा हे या लोकांकडून शिकायला हवं. या व्यक्ती वादविवादात हुशार, श्रीमंत आणि तीक्ष्ण बुद्धीच्या असतात. भौतिक सुखासाठी या व्यक्ती कधी कधी चुकीच्या मार्गावर जातात त्यामुळे त्यांचे नुकसान होवू शकते.
शनिवार
शनिवारी जन्मलेल्या लोकांवर शनिचा प्रभाव असतो. या व्यक्ती कठोर स्वभावाच्या तसेच धाडसी आणि मेहनती असतात. या लोकांचा स्वभाव थोडा गंभीर असतो त्यामुळे काहीवेळेला विनोद करणे आणि मजा करणे त्यांना आवडत नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांचे संबंध खूप चांगले असतात. शनिवारी जन्मलेले लोक व्यावहारिक असतात. त्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वतःच्या अनुभवातून शिकण्याची सवय असते. या लोकांना ग्रुपमध्ये काम करताना थोडी भीती वाटते. शनिवारी जन्मलेल्या लोकांना व्यवसाय करणे आवडते. ऑफिसमधील वेळेचे बंधन त्यांना अजिबात आवडत नाही.
रविवार
ज्या लोकांचा जन्म रविवारी झालेला आहे त्यांच्यावर सूर्याच्या खूप प्रभाव असतो. अशा व्यक्ती तेजस्वी, हुशार, सदाचारी, उत्साही, दानशूर असतात पण त्याचबरोबर थोडे गर्विष्ठ स्वभावाचे असतात. रविवारी जन्मलेल्या लोकांना खूप राग येतो. सामान्य गोष्टीत त्यांना समाधान त्यांना मिळत नाही, ते नेहमी काहीतरी वेगळा विचार करतात. या लोकांना नेहमी कोणत्याही गोष्टीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असते. रविवारी जन्मलेले लोक सहसा खूप रोमँटिक मानले जातात. असे म्हटले जाते की त्यांना जे लोक आवडतात त्यांचे ते मनापासून कौतुक करतात.