संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान, �

पुणे,दि.२९:- संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दुपारी ४ वाजता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालखीचे आज आळंदी येथील देऊळवाड्यातून प्रस्थान झाले. यावेळी हजारो वारकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, यंदा माऊलींच्या पालखीच्या बैलजोडीचा मान आळंदी गावातील कुऱ्हाडे कुटुंबाला मिळाला आहे. या माध्यमातून या कुटुंबाची तब्बल 25 वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे.

यंदा संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळ्याचे हे 193 वे वर्ष आहे.

आज पालखीचा पहिला मुक्काम आळंदी येथीलच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असेल. त्यानंतर उद्या ३० जून रोजी पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल.

१६ जुलै रोजी पालखी पंढरपुरात पोहोचणार

१५ जुलै रोजी पालखी वाखरीला पोहोचेल. तर १६ जुलै रोजी वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल. १७ जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेचा सोहळा आहे. त्यामुळे २० जुलैपर्यंत माऊलींची पालखी पंढरपूर नगरीतच राहील. त्यानंतर २१ जुलै रोजी वारकरी पालखीसह ग्यानबा तुकारामचा जयघोष करत परतीच्या प्रवासाला आळंदीच्या दिशेने निघतील.

माऊलींच्या पालखीचा बैलजोडीचा मान यंदा आळंदी येथील कुऱ्हाडे कुटुंबाला मिळाला आहे. यंदा बैलजोडीच्या मानासाठी कुऱ्हाडे घराण्यातील ७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या बाजी व हौश्या या बैलजोडीला मानाचा पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला. या कुटुंबाला तब्बल २५ वर्षांनंतर हा मान मिळाला आहे. या बैलांची दरवर्षीप्रमाणे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

संत तुकारामांच्या पालखीचा आज आकुर्डीत मुक्काम

दुसरीकडे, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने शुक्रवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात ही पालखी १६ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. ही पालखी आज शनिवारी २९ जून रोजी पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्गाजवळ, तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल. संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामाला थांबेल.

पालखीच्या मार्गावर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता टँकर उपलब्ध केले आहेत. सिद्धबेट, नदी घाट, नवीन पुलासह संपूर्ण महत्त्वाच्या ठिकाणीची स्वच्छता पूर्ण झाली आहे. वारी कालावधीत ३ पाळ्यांमध्ये साफसफाई केली जाणार आहे. १८०० फिरत्या शौचालयांची उपलब्धता केली आहे. दिवाबत्तीची कामे पूर्ण झाली आहे. ६० ठिकाणी १३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. या प्रकरणी ३ बोटी तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

Comments (0)
Add Comment