‘व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांमध्ये घरातील माता-भगिनींचे सर्वांत मोठे योगदान आहे. सर्वप्रथम तुम्ही आपल्या पतींना बाहेर मद्यपान करू नका असे सांगा. त्यांना सांगा, तुम्हाला प्यायचे असेल तर घरीच प्या, घरतले खाद्यपदार्थ खा आणि माझ्यासमोरच राहा. तुमच्यासमोर दारू प्यायले तर त्यांची पिण्याची मर्यादा कमी होत जाईल. ते हळूहळू दारू सोडण्याच्या मार्गावर येतील. बायको-मुलांसमोर दारू प्यायची त्यांना लाज वाटेल’, असे कुशवाह या कार्यक्रमात म्हणाले. ‘तुम्ही दारू प्यायलात तर भविष्यात मुलेही या मार्गाकडे वळतील, असे बायकांनी त्यांच्या नवऱ्याला सांगायला हवे. महिलांनी स्थानिक गट तयार करून दारू पिणाऱ्यांना लाटण्यांचा इंगा दाखवावा’, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
कुशवाह यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. ‘असा सल्ला देऊन कुशवाह घरगुती हिंसाचारास प्रोत्साहन देत आहेत’, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या संगीता शर्मा यांनी दिली. ‘घरगुती हिंसाचाराचे मुख्य कारण म्हणजे व्यसन आणि दारू आहे. दारूमुळे होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित १७ हजारहून अधिक प्रकरणे मध्य प्रदेश महिला आयोगासमोर प्रलंबित आहेत. मंत्री महोदय महिलांना त्यांच्या पतींविरुद्ध लाटण्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहेत. यामुळे घरगुती हिंसाचारात अधिक वाढ होईल. त्यांनी अशा बेजाबदार वक्तव्याबद्दल माफी मागावी’, अशी मागणीही शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
…तर सकारात्मक परिणाम
‘घरात मुलांसमोर मद्यपान केल्याने पुरुषांना लाज वाटेल व त्यांची सवय सोडण्यास ते परावृत्त होतील. मुलांनी त्यांच्या वडिलांना दारू न पिण्याची विनंती केल्यास त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल’, असे कुशवाह नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.