सहा सरकारी अधिकारी निलंबितरस्तेबांधकामात गंभीर निष्काळजी दाखवल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) ध्रुव अग्रवाल (कार्यकारी अभियंता), अनुज देशवाल (सहायक अभियंता) आणि प्रभात पांडे (कनिष्ठ अभियंता) यांना, तर उत्तर प्रदेश जल निगमच्या आनंदकुमार दुबे (कार्यकारी अभियंता), राजेंद्र कुमार यादव (सहायक अभियंता) आणि मोहम्मद शाहिद (कनिष्ठ अभियंता) यांना उत्तर प्रदेश सरकारने निलंबित केले. अहमदाबाद येथील कंत्राटदार भुवन इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेड यालाही सरकारने या प्रकरणात नोटीस बजावली आहे.
‘रामपथाचा सर्वांत वरचा थर बांधकामानंतर लगेचच खराब झाला. यातून उत्तर प्रदेश सरकारच्या प्राधान्यक्रमात येणाऱ्या कामात हलगर्जी दाखवण्यात आल्याचे स्पष्ट होते. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये राज्याची प्रतिमा खराब झाली’, असे ‘पीडब्ल्यूडी’च्या कार्यालयीन आदेशात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे ‘पीडब्ल्यूडी’चे प्रधान सचिव अजय चौहान यांनी सांगितले.
दिल्लीत पावसाचे आठ बळी
नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे दिल्लीतील वसंत विहार भागात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यातून शनिवारी तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. संतोषकुमार यादव (१९) आणि संतोष (३८) अशी मृत्यू झालेल्या दोन मजुरांची नावे असून, तिसऱ्याची ओळख पटलेली नाही. पावसामुळे शुक्रवारी ही भिंत कोसळली होती. राजधानीत पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आठ झाली आहे.
अंत्यसंस्कारानंतर कायदेशीर लढ्याचा विचार
नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१च्या छताचा भाग कोसळून रमेश कुमार (४५) या टॅक्सीचालकाचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. रमेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर याप्रकरणी कायदेशीर लढा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांचा मुलगा रवींदर याने नमूद केले. सफदरजंग रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रमेश यांचा मृतदेह शनिवारी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.