जळगाव : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील महिला दक्षता समिती कार्यालयातील एएसआय तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मिलिंद सांडू केदार (वय ५४, रा.कृषी कॉलनी, प्लॉट नं.१५, नवसाचा गणपती मंदीराजवळ जळगाव, ता.जि.जळगाव) यांना २० हजारांची लाच स्वीकारताना बुधवारी दुपारी साडेतीन वाजता कार्यालयातच अटक झाल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगावातील रायपूर येथील ३०वर्षीय पुरूष तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदार यांच्या पत्नीने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांविरोधात तक्रार अर्ज केला होता शिवाय या अर्जाच्या चौकशीअंती त्यांच्या पत्नीला कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर तक्रारदार यांना या प्रकरणात योग्य ती मदत करण्यासाठी बुधवार, दि. १७ऑक्टोंबर रोजी मिलिंद केदार यांनी २५ हजारांची लाच मागितल्यावर व तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिला सहाय्य कक्षात केदार यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष अटक केली.नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.