या घटनेचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात अग्निशमन दलाचे जवान दोरीच्या साह्याने त्यांना नदीतून सुखरूप बाहेर काढताना दिसत आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून जात त्यांची कार एका झाडाला अडकली. त्यामुळे ते दरवाजा उघडून कसेतरी बाहेर आले आणि त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
हे तरुण शेजारच्या कर्नाटक राज्यातील रुग्णालयात जात होते. त्यासाठी ते गुगल मॅपचा वापर करत होते. गुगल मॅपने एक अरुंद रस्ता दाखवला आणि त्यांनी आपली कार त्या दिशेने नेली, अशी माहिती यातील अब्दुल रशीद या तरुणाने दिली. ‘हेडलाइटच्या साह्याने आम्हाला समोर थोडे पाणी असल्यासारखे जाणवले. मात्र दोन्ही बाजूंना नदी आणि मध्यभागी पूल असल्याचे दिसले नाही. या पुलाला बाजूची भिंतही नव्हती’, असे रशीदने एका वृत्तवाहिनीला सांगितले. ‘आम्ही जिवंत राहू असे वाटले नव्हते. हा आमचा पुनर्जन्म आहे’, असेही तो म्हणाला.
मागील महिन्यात अशाचप्रकारे चार पर्यटक गुगल मॅपवर विसंबून हैदराबादच्या कोट्टायममधील कुरूपंथराजवळ एका पूर आलेल्या नाल्यात उतरले होते. नजीकचे पोलिस गस्त पथक आणि स्थानिकांनी त्यांना वाचवले; परंतु त्यांची कार पाण्यात वाहून गेली.