(शैलेश चौधरी)
एरंडोल: तालुक्यात अतीवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप हंगामावर अक्षरश: पाणी फिरले आहे.
यंदा कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे.
दरम्यान,तालुक्यात उञाण महसूल मंडळातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून विखरण, एरंडोल, कासोदा या परीसरातील पंचनाम्यांचे काम अंतीम टप्प्यात असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी दिली आहे.
एरंडोल तालुक्यात सुमारे ३३हजार हेक्टर क्षेञाला अस्मानी संकटाचा फटका बसला आहे. कापूस, सोयाबिन, कांदा, मका, बाजरी यांचेसह सर्व खरीप पिकांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. अतीवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतांत पाणी साचले आहे.
विशेषतः नद्या,नाले,ओढे भरून वाहिल्यामुळे काठावरील शेतांमधील पिके जलमय झाली आहेत. पाणीच पाणी चोहीकडे.. खरीप हंगाम गेला कुणीकडे..? असे विदारक चिञ दिसत आहे.
७ऑक्टोंबर पासुन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी व कृषी सहायक करीत आहेत माञ तालुका प्रशासनाने ग्रामसेवकांनासुध्दा नुकसानीचे पंचनामे करण्याची सुचना दिलेली असताना त्यांचा कुठेही पंचनाम्याच्या कामात सहभाग दिसून येत नसल्याचे शेतकर्यांच्या गोटातून बोलले जात आहे.
एरंडोल महसूल मंडळात तलाठी सलमान तडवी व कृषी सहायक दिपक चव्हाण हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन वास्तव पंचनामे करीत आहेत यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मुदत वाढवावी अशी जोरदार मागणी शेतकरी करीत आहेत.शेतीउद्योग बेभरवश्याचा झालेला असून वारंवार येणार्या अस्मानी संकटांमुळे शेतीचा उद्योग याला जुगारापेक्षाही अधिक ‘धोका, निर्माण झाला आहे.
कधी आस्मानी तर कधी सुल्तानी अश्या संकटांच्या दूहेरी चक्रात अडकलेला शेतकरी वर्ग शेतीपासून स्वत:चे नाते तोडू शकत नाही म्हणून तो आर्थिक नुकसान व तोटा सहन करून शेती व्यवसायाशी जुळलेली आपली नाळ कायम राखुन नव्या उमेदीने रब्बी पेरण्यांसाठी सज्ज झाला आहे.