तोरघुंडी, स्पिन बोल्डक, इस्लाम काला आणि फ्रेंडशिप ब्रिज या सीमेवरील ठिकाणांहून हे नागरिक मायदेशात आले आहेत. अफगाणिस्तानचे नागरिक असल्याविषयीची ठोस कागदपत्रे नसणाऱ्या नागरिकांना परत पाठविण्यात येत असल्याचे या दोन्ही देशांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे, काही महिन्यांमध्ये पाकिस्तान व इराणमधून अफगाणिस्तानात परत पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. पुरेशी कागदपत्रे असतानाही, पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बळजबरीने परत पाठविण्यात आले; तसेच इराणच्या पोलिसांनी वाईट वागणूक दिली, असा आरोप काही अफगाण नागरिकांनी केली आहे.
अफगाणिस्तानच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. यामध्ये पुरेशी कागदपत्रे नसणाऱ्या अफगाण नागरिकांना परत पाठविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येतील, यावर त्यांनी जोर दिला होता.
मूलभूत गरजा भागविणेही कठीण
अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती बिकट असून, मूलभूत गरजा पूर्ण करणेही नागरिकांना आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे, शेजारी देशांतून बळजबरीने परत पाठविण्यात आलेल्या या हजारो नागरिकांसमोरील आव्हान अधिक कठीण असणार आहे. या निर्वासितांमध्ये अनेक महिला व मुले असून, त्यांची परिस्थिती बिकट असल्याचे सांगण्यात येते.
महिलांवर निर्बंध
अफगाणिस्तानात २०२१मध्ये अमेरिका आणि ‘नाटो’ फौजांनी माघार घेतली आणि ‘तालिबान’ने सत्ता काबीज केली. याच काळामध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली; तसेच वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली. महिलांच्या बाहेर फिरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.