महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे…
मुंबई – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलमं हटवण्यात आली असून काही नवीन कलमं जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस, वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होणार आहेत. १ जुलैपूर्वी नोंदवलेल्या खटल्यांवर आणि खटल्यांच्या तपासावर नव्या कायद्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच १ जुलैपासून नवीन कायद्यानुसार सर्व गुन्ह्यांची नोंद केली जाईल. कोर्टामध्ये जुन्या खटल्यांची सुनावणी जुन्या कायद्यानुसारच होईल. नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये नवीन प्रकरणांची चौकशी आणि सुनावणी केली जाईल. गुन्ह्यांसाठीची प्रचलित असलेले कलम आता बदलण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालय, पोलीस आणि प्रशासनालाही नव्या कलमांचा अभ्यास करावा लागणार आहे.
देशात १ जुलैपासून लागू झालेल्या नवीन कायद्यांअंतर्गत राज्यभरात सायंकाळपर्यंत १२२ गुन्हे दाखल झाले आहेत. मालमत्ता चोरी अथवा गंभीर गुन्ह्यांचा विचार केल्यास पहिला दरोड्याचा गुन्हा अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३०९(४) अंतर्गत दाखल झाला. तर सायबर फसवणुकीचा पहिला गुन्हा मुंबईतील डी. बी.मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला. मुंबईत सोमवारी सायंकाळपर्यंत १२ गुन्हे दाखल झाले होते. नव्या कायद्याअंतर्गत दुपारपर्यंत आठ ऑनलाईन तक्रारी राज्य पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदे १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत नवीन कायद्यांतर्गत राज्यात १२२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. नवीन कायद्यांतील तरतुदींनुसार अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मालमत्ता चोरी अथवा गंभीर गुन्ह्यांचा विचार केल्यास हा पहिला गुन्हा असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात काही दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मालमत्ता चोरीचा हा राज्यातील पहिला गुन्हा म्हणता येईल, अशी माहिती पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली.
दुसरीकडे मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्याच्या श्रेणीतील कायद्याच्या नवीन तरतुदींनुसार पहिला गुन्हा नोंदविण्यात आला. त्यात दिलीप सिंह नावाच्या व्यक्तीला कर्ज देण्याच्या नावाखाली त्याची ७३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २६ जून रोजी घडली होती. पण तक्रार व त्याची पडताळणी करून १ जुलै रोजी २.३० च्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला. मुंबईत सायंकाळपर्यंत नवीन कायद्याअंतर्गत १२ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच छत्रपती संभाजी नगर रेल्वे पोलिसांद्वारे भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी पहिला ‘झिरो एफआयआर’ दाखल केला आहे.