संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यसभेत सभापती जगदीप धनखर यांनी खासदार अशोक चव्हाण यांचं नाव पुकारलं. चव्हाण भाषणासाठी उभे राहिले. आदरणीय सभापतीजी म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. पण तितक्यात सभापतींनी त्यांना रोखलं. चव्हाण यांचं पहिलंच भाषण असल्यानं सभापतींनी त्यांची तोंडओळख सभागृहाला करुन दिली.
अशोकराव शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री, लोकसभेचे दोनदा सदस्य, चारवेळा आमदार आणि परिषदेचे सदस्य अशी माहिती देत सभापतींनी सभागृहाला चव्हाणांचा अल्पपरिचय दिला. चव्हाणांनी भूषवलेल्या पदांची माहिती सभापतींकडून दिली जात असताना सभागृहातील काही खासदारांनी काँग्रेस, काँग्रेस असं ओरडण्यास सुरुवात केली. जुन्या पक्षाच्या उल्लेखानं खासदारांनी चव्हाणांचं लक्ष वेधून घेतलं.
खासदार काँग्रेस, काँग्रेस करु लागताच अशोक चव्हाणांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. होय, होय, मी काँग्रेसकडूनच होतो. सभापती महोदय, तुम्ही माझा बायोडेटा संक्षिप्त रुपात वाचलात, भूषवलेल्या पदांचा उल्लेख केल्यात त्याबद्दल आपले आभार. मी काँग्रेसकडून निवडून आलो होतो आणि मला त्याा अभिमान आहे. त्याबद्दल कोणतीही शंका असण्याचं कारण नाही, असं चव्हाण म्हणाले. यावर सभापतींनी मंद स्मित केलं.
पहिल्या भाषणात काय म्हणाले चव्हाण?
लोकसभा, राज्यसभेत खासदार बोलतात. त्यांना संरक्षण असतं. संरक्षण असल्यानं फायदा मिळतो. पण खासदारांच्या बोलण्यात सत्यता असायला हवी. सध्याच्या घडीला नरेटिव्ह पसरवली जातात. सध्याचा जमाना नरेटिव्हचा आहे. त्याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे. खरे, खोटे नरेटिव्ह पसरवले जातात, असं चव्हाण म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना संविधान बदलणार असल्याचं नरेटिव्ह पसरवण्याच आलं आहे. भाजपला घटना बदलायची आहे असं नरेटिव्ह मांडण्यात आलं. त्यात तथ्य नसल्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. संविधान बदलाचं नरेटिव्ह खोटं होतं. पण राजकीय नेत्यांच्या भाषणांमध्ये त्याच गोष्टीचा उल्लेख होता, याची आठवण चव्हाणांनी करुन दिली.