तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह हाती घेऊन पत्नीचा शोध
काही लोकांना त्यांचे नातेवाईकांचे मृतदेह सापडले आहेत, तर काहीजण अजूनही त्यांच्या शोधात फिरत आहेत. यादरम्यान एक व्यक्ती आपल्या तीन वर्षांच्या लेकाचा मृतदेह हातात घेऊन पत्नीचा शोध घेताना दिसून आली. हा चिमुकला आपल्या आईसोबत सत्संगमध्ये आला होता. जेव्हा वडिलांना चेंगराचेंगरी झाल्यीची माहिती मिळाली तेव्हा ते घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना आपल्या मुलाचा मृतदेह सापडला. पण, त्यांच्या पत्नीबाबत अज्ञाप काहीही माहिती नाही. हाती लेकाचा मृतदेह डोळ्यात आसवं घेऊन ही व्यक्ती आपल्या पत्नीला त्या मृतदेहांच्या गर्दीत शोधत आहे. हे दृश्य मन सुन्न करणारं होतं. आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह हाती घेऊन शवागरात पत्नीला शोधावं लागेल याची कल्पना त्याने कधी स्वप्नातही केली नसेल.
व्हिडिओमध्ये आई दिसली अन् मग…
दुसरीकडे, मथुरा येथील सोहनलाल यांच्या वहिणी या सत्संगमध्ये आल्या होत्या. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सोहनलाल यांच्यासोबत वहिणीची मुलंही रुग्णालयात पोहोचली. आईचा अशाप्रकारे मृत्यू झाला यावर मुलांचा विश्वासच बसत नाहीये. त्यांची आई एकटीच या सत्संगला आली होती. जेव्हा हे पोरं व्हॉट्सएपवर या घटनेचा व्हिडिओ पाहत होते तेव्हा त्यांना त्यांची आई जमिनीवर पडलेली दिसून आली. त्यानंतर हे लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अनेक तासांच्या शोधानंतर अखेर त्यांचा मृतदेह हाथरसच्या शवागारात आढळून आला.
अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर नंदेचा मृतदेह सापडला
तर एका महिलेने आपल्या नंदेला गमावलं आहे. या दुर्घटनेत त्यांच्या नंदेचा मृत्यू झाला. अनेक तासांच्या शोधानंतर त्यांना त्यांच्या नंदेचा मृतदेह सापडून आला. तसेच, असे अनेक कुटुंब आहेत जे अजूनही शवागाराबाहेर आपल्या प्रियजनांना शोधताना दिसून येत आहेत. नातेवाईकांचा मृतदेह शोधणारे कुटुंब, आक्रोश करणाऱ्या महिला, आई-वडील गमावलेली पोरं, असे अनेकजण हाथरसच्या रुग्णालयात दिसत आहेत. साऱ्यांच्या चेहऱ्यावर दु:ख आणि निराशा दिसत आहे. ही सारी परिस्थिती मन हेलावणारी आहे.