लातूर : मांजरा नदीच्या पुलावरून नदीत उडी घेत एका २१ वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. मात्र सदर तरुणाचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर ३ दिवसांनंतर प्रशासनाला या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे.
लातूर मनपाच्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आज १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान सदर युवकाचा रमजानपूरजवळ मृतदेह तरंगत असल्याचं आढळलं. या युवकाचे नाव दासू वामनराव खोबे असून तो नांदेड येथील विष्णूनगर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झालं आहे.
या युवकाने आत्महत्या का केली, यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेत शोधकार्य करण्यासाठी लातूर मनपाच्या अग्निशमन दलाचे अनिकेत येरोळकर, मोहसीन शेख, निलेश आचार्य, रवी भोसले, कृष्णा दिवे, मगर ज्ञानेश्वर, बाळासाहेब जाधव आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.