राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेतील भाषणादरम्यान भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. यासंदर्भात काही दक्षिणपंथीय संघटनांकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी माहिती मंगळवारी मिळाली. त्यानंतर मध्य दिल्लीतील राहुल गांधी यांच्या निवासस्थाना बाहेर तसेच परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली. पोलिसांनी या परिसरात होर्डिंग लावण्यावर किंवा लोकांना जमा होण्यास बंदी घातली आहे. स्थानिक पोलिसांना राहुल गांधींच्या घराबाहेर २४ तास सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते. त्यांनी सोमवारी संसदेत केलेल्या भाषणावरून संपूर्ण देशात प्रतिक्रिया उमटली होती. बुधवारी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्यावर आंदोलन करण्यात आले होते. राहुल गांधींनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती. या आंदोलकांनी अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता.
लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधताना जे स्वत:ला हिंदू असल्याचे सांगत आहेत ते फक्त हिंसा, द्वेष आणि असत्य बोलत असतात. त्यावर पंतप्रधान मोदींनी संपूर्ण हिंदू समाजाबद्दल असे बोलणे हा गंभीर विषय असल्याचे म्हटले होते. तर राहुल गांधींनी त्याल उत्तर देताना मोदी किंवा भाजप किंवा आरएसएस म्हमजे संपूर्ण हिंदू समाज नाही, असे म्हटले होते.
याआधी २७ जून रोजी AIMIMचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या निवास स्थानाबाहेर काही लोकांनी पोस्टर चिकटवले होते. ज्यामध्ये लोकसभेत शपथ घेताना त्यांनी जी घोषणा बाजी केली होती त्यावरून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.