पोलिस शिपायाला हार्ट अटॅक
हाथरस येथील दुर्दैवी घटनेनंतर क्युआरटीच्या ड्युटीवर तैनात असलेले शिपाई रवी यादव (राहणारे अलीगड) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. रवी यादव यांची ड्युटी मृचदेहांची व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. याबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक जगदीश चंद्र मौर्य यांनी सांगितलं की, शिपाई रवी यादव यांची ड्युटी हाथरस दुर्घटनेत मृतदेहांच व्यवस्था करण्यात लावण्यात आली होती. ड्युटी दरम्यानच त्यांना हार्ट अटॅक आला.
एटाचे एसपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, हाथरस जिल्ह्याच्या मुगलगढी या गावात एक धार्मिक कार्यक्रम सुरु होता. तेव्हा अचानक चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह एटा रुग्णालयात आणण्यात आले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचेही मृतदेह होते. या सर्व मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. या घटनेमागील कारणांच्या तपासासाठी एडीजी आग्रा आणि अलीगडच्या आयुक्तांचं पथक तयार करण्यात आलं आहे.
हाथरसमध्ये काय घडलं?
हाथरसमध्ये भोले बाबा नावाच्या व्यक्तीचं सत्संग सुरु होतं. तिथले लोक या बाबाला खूप मानतात. त्याचं सत्संग ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. जेव्हा या बाबाची गाडी बाहेर पडली तेव्हा त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली, यातच चेंगराचेंगरी झाली. काही लोक खाली पडले, त्यांच्यावर पाय ठेवून इतर लोक गेले. या घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यका आहे. तर, भोले बाबा घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.